धानोरा तालुक्यात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा.

धानोरा तालुक्यात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


धानोरा : दि.३० सप्टेंबर २०२५ धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने राष्ट्रीय पोषण माह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम CRY संस्था, एकात्मिक बालविकास सेवा (ICDS) व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. 



या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य व पोषण विषयक जनजागृती निर्माण करणे,शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच गर्भवती व स्तनदा माता,लहान बालके व किशोरी मुली यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवणे हा होता.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सखाराम हिचामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून CRY जिल्हा समन्वयक श्री.अंकुश राठोड, सिनियर ट्रेनर कृष्णकांत घोगरे, सुपरवायझर मडावी मॅडम, जेंघटे मॅडम आणि विस्तार अधिकारी बारसागडे उपस्थित होते. 


यावेळी CRY-DI गडचिरोलीचे सर्व समुदाय संघटक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कार्यक्रमादरम्यान पोषण अभियानाचे महत्त्व, बालकांचे पहिले 1000 दिवस, कुपोषण प्रतिबंध, ऍनिमिया नियंत्रण, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि संतुलित आहार यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. क्षेत्रातील लाभार्थी हे THR (Take Home Ration) चा योग्य उपयोग करीत नाहीत व सेवन करण्यास कंटाळतात असे दिसून आले. 


त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने THR पासून बनविलेले स्वादिष्ट पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. CRY टीमने शेवग्याच्या पाल्याचे पराठे, विविध रानभाज्यांचे पदार्थ, काढा, भजी, चकली तसेच रानफळे आणि THR पासून बनविलेले भजी व सोजी या पाककृती सादर करून त्यातील पोषक घटकांची माहिती दिली.


अंगणवाडी सेविकांनी कलापथक नाटिकेद्वारे आरोग्य व पोषणाविषयी जनजागृती केली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध पदार्थांच्या कृती प्रत्यक्ष अनुभवल्या व पोषण आहाराबद्दल आपले ज्ञान वाढवले. कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबीरही घेण्यात आले, जिथे गरोदर माता, ० ते ५ वयोगटातील बालके, महिला व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून स्थानिक आरोग्य तज्ज्ञांनी आवश्यक मार्गदर्शन दिले.


या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत ठोस जनजागृती झाली. महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व पटले तसेच बालकांचे पहिले 1000 दिवस पोषणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत याची माहिती मिळाली. आरोग्य विभाग, ICDS, CRY-DI गडचिरोली व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !