उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल राहुल भोयर यांचा सन्मान.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरीतील झाशी राणी चौक पटांगणावर दिवाळीच्या उजेडात, संगीताच्या सुरात आणि सामाजिक स्नेहाच्या मंगल वातावरणात पार पडलेल्या दिवाळी स्नेहमिलन संध्या या कार्यक्रमाने शहरातील संस्कृती,परंपरा आणि समाजबंधांची सुंदर सांगड घातली.
परंतु या कार्यक्रमात एक ठळकपण दिसला तो म्हणजे पत्रकारितेचा निडर आवाज म्हणून परिचित असलेल्या राहुल भोयर यांच्या कार्याचा सन्मान, एक असा सन्मान, ज्यामागे संघर्ष, प्रामाणिकता आणि समाजाप्रती निष्ठा अशा तीन आधारस्तंभांचा ठाम पाया आहे.
एखाद्या छोट्याशा डिजिटल पोर्टलपासून पत्रकारितेची सुरुवात करणाऱ्या राहुल भोयर यांनी अनेक अडचणी, विरोध आणि दबाव यांच्याकडे कधीही पाठ फिरवली नाही. सुरुवातीच्या काळात पीडीएफ स्वरूपात निघणाऱ्या छोट्या वृत्तपत्रात काम करताना त्यांची तळमळ,जिद्द आणि सत्य शोधण्याची वृत्ती दिसून येत होती. त्या
नंतर " विदर्भ की दहाड " सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात काम करताना त्यांच्या प्रतिभेची दखल घेऊन त्यांचा अमरावती येथे विशेष सन्मान करण्यात आला होता. सत्याला भिडणाऱ्या त्यांच्या निर्भय शैलीला तेव्हाच सामाजिक आणि पत्रकारितेच्या वर्तुळात मान्यता मिळू लागली.
राहुल भोयरांची पत्रकारिता ही केवळ वृत्तसंकलनाची यांत्रिक प्रक्रिया नसून एक सामाजिक बांधिलकी आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी प्रेरित आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांना घट्ट धरून ठेवणारी त्यांची लेखणी कधीही कुणाच्या दडपणाखाली वाकली नाही. अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, प्राशासनिक बेफिकीरी या प्रत्येक विषयावर त्यांनी सातत्याने प्रहार केला.त्याची किंमत म्हणून त्यांना धमक्या, मानहानीची भीती, अगदी ऍट्रॉसिटी केससारख्या दबावतंत्रांचाही सामना करावा लागला.पण त्यांच्या पावलांना कधीही अडथळा आला नाही. चूक कोणाचीही असो ती चूक आहे हे स्पष्टपणे सांगण्याची त्यांची वृत्तीच त्यांच्या पत्रकारितेला वेगळेपण देणारी ठरली आहे.
आज " ब्रह्मपुरी दर्पण " हे वृत्तपत्र त्यांच्या अथक परिश्रमांचे, सचोटीने केलेल्या सामाजिक कामाचे आणि निर्भयतेचे जिवंत प्रतीक बनले आहे. वाचकांच्या अपेक्षेप्रमाणे सत्य मांडणे, अन्यायकारक निर्णयांवर आवाज उठवणे, दुर्बलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करणे या मार्गावर ते प्रामाणिकतेने वाटचाल करत आहेत. अनेकांनी मनभेद, वैचारिक मतभेद, राजकीय स्वार्थ यांचा आधार घेऊन त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही राहुल भोयरांनी आपली पत्रकारिता कोणत्याही कारणास्तव थांबवली नाही. त्यांच्या या न डगमगणाऱ्या वृत्तीचीच प्रतिमा आज ब्रह्मपुरीच्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या विश्वात ठामपणे उभी आहे.
दिवाळी स्नेहमिलन संध्या या कार्यक्रमात शहरातील मान्यवरांची उपस्थिती, कला आणि संस्कृतीचे दर्शन, सामाजिक सुसंवादाचा संदेश या सगळ्या गोष्टी होत्या.परंतु महत्त्वाचा ठरला तो राहुल भोयरांच्या कार्याला मिळालेला दाद आणि सन्मान. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला आणि त्यात ब्रह्मपुरीतील नागरिकांनी दिलेला सन्मान हीच त्यांच्या सामाजिक योगदानाची खरी पावती ठरली.
निर्भय सत्यशोधक पत्रकार अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सतत लढणारी लेखणी,कोणत्याही दबावाला न घाबरणारा निडर आवाज,फुले - शाहू-आंबेडकर विचारांनी प्रेरित सामाजिक बांधिलकी,अल्पावधीत " ब्रम्हपुरी दर्पण " चे उल्लेखनीय नेतृत्व,धमक्या,दबाव व खोटे आरोप यांनाही न डगमगता पत्रकारितेची वाटचाल. - राहुल भोयर संपादक - ब्रम्हपुरी दर्पण.

