सिंदेवाही तालुक्यात शेतात काम करत असताना शेतकरी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
एस.के.24 तास
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात शनिवारी (दि.13 डिसेंबर 2025) वाघाच्या भयानक हल्ल्यात शेतकरी महिला छाया अरुण राऊत वय,49 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सकाळी धान आणि तुरीची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या छायाचा सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेताला लागून असलेल्या नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला.
प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती; हात शरीरापासून तुटलेले आणि वेगळ्या ठिकाणी पडलेले होते, तसेच मान मोडलेली आढळली.शनिवारी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला.
उशीर झाल्यामुळे पोस्टमॉर्टेम रविवारी करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांनी तातडीने 25,000/- रुपये रोख मदत देत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.पोस्टमॉर्टेम नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुंजेवाही येथे नेण्यात आला.
या घटनेमुळे गुंजेवाही गावात भीतीचे वातावरण पसरले असून, गावकऱ्यांनी वाढत्या वाघाच्या वावरावर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलिस करत आहेत.

