रोशन कुडे मूत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला सोलापुरातून अटक.
📍कृष्णा उर्फ मल्लेश याला ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : नागभीड मूत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य एजंट डॉ.कृष्णा याला विशेष तपास पथकाने सोलापूर येथून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.सर्वत्र डॉ.कृष्णा नावाने वावरत असलेल्या या एजंटचे खरे नाव मल्लेश असे आहे.
तो अभियंता असल्याचे सांगितले जात आहे.कापड व्यवसायात अपयश आल्याने मल्लेशने स्वत: आठ लाखांत मूत्रपिंड कंबोडियात विकले आहे.तो आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या गरिबांचा शोध घ्यायचा आणि त्यांना मूत्रपिंड विक्रीसाठी प्रोत्साहन द्यायचा.
या प्रकरणात आणखी बरेच पीडित असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मल्लेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे या पीडित शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात मूत्रपिंडाची विक्री केली.हरियाणा येथून ऑपरेट होणाऱ्या " किडनी डोनर कम्युनिटी " या फेसबुक पेजच्या माध्यमातून कुडे तथाकथित डॉक्टर कृष्णाच्या संपर्कात आला.
सोलापूर येथे वास्तव्य असलेला कृष्णा हा स्वत:ला चेन्नई येथील रहिवासी असून सर्वत्र डॉक्टर असल्याचे सांगत होता.कुडे याला त्याने डॉक्टर असल्याचे सांगून मूत्रपिंड विक्रीसाठी तयार केले. ते दोघे व्हॉट्सपॲपच्या माध्यमातून संपर्कात होते.
आठ लाख रुपयात मूत्रपिंड विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा कंबोडियाला जाण्याच्या आधी कोलकता विमानतळावर या दोघांची पहिली आणि शेवटची भेट झाली.मूत्रपिंड विक्रीनंतर ते एकमेकांच्या बराच काळ संपर्कात होते.या प्रकरणात सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर देशात खळबळ उडाली व तपासासाठी विशेष पथक गठित केले. याच पथकाने रविवारी डॉ. कृष्णा याला सोलापुरातून ताब्यात घेतले आहे.
या तपासाबद्दल पोलिसांनी गोपनीयता पाळली असून एक पथक कोलकता, एक हरियाणा आणि इतरत्रही गेल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी त्याला ताब्यात घेऊन सोमवारी पहाटे चंद्रपुरात आणण्यात आले.कृष्णाला अटक केल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पीडित रोशन कुडे याला " व्हिडीओ कॉल " करून ओळख पटवण्यात आली.
सोमवारी पोलिसांनी कृष्णा उर्फ मल्लेश याला ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
देशात खळबळ उडविणाऱ्या पीडित शेतकऱ्याच्या मूत्रपिंड विक्री प्रकरणात " किडनी डोनर कम्युनिटी " हे समाज माध्यमावर सक्रिय फेसबुक पेज हरियाणा येथील एक व्यक्ती संचालिच करत होता.
अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.या फेसबुक पेजला अनेक युवक बळी पडले असावे अशीही शक्यता व्यक्त होत असून पोलिसांनी सखोल तपासावर लक्ष केंद्रित केले आहे.