❗बिबट्याच्या हल्ल्यात बांबू कटाई करणाऱ्या मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील प्रतला गावचा रहिवासी मजुराचा मृत्यू
📍मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर बिटातील घटना
एस.के.24 तास
चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर बिटात आज सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जंगलात उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या एका मजुराचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील प्रतला गावचा रहिवासी साहजू चमरू बिलठेरिया वय,64 वर्ष हा मजूर अडेगाव गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक,181 मध्ये बांबू कटाईचे काम करीत होता. आज सकाळी सुमारे 8:30.वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्याला ठार केले.सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलात पसार झाला.घटनेची माहिती मिळताच मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाने तत्काळ परिसराची पाहणी करत सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या.दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे व त्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीचा आधार म्हणून वन विभागाकडून रुपये 50 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

