झेंडेपार ग्रामसभेचा एल्गार अवैध उत्खनन करणारे लोहखनिज भरलेले बिनानंबरचे ट्रॅक्टर जप्त ; FIR होत नसल्याने मोठ्या हातांचा संशय.
एस.के.24 तास
कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार ग्रामसभेने जल - जंगल - जमिनीच्या रक्षणासाठी थेट रस्त्यावर उतरून अवैध उत्खननाविरोधात निर्णायक संघर्ष पुकारला आहे.दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी झेंडेपार हद्दीतून जंगलातील लोहखनिज व दगड-गोटे अवैधरित्या वाहतूक करणारे बिनानंबर प्लेटचे ट्रॅक्टर ग्रामसभेच्या गस्ती दरम्यान रंगेहात पकडून जप्त करण्यात आले.
या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शक्तींना जबर धक्का बसला आहे.विशेष बाब म्हणजे,जप्त करण्यात आलेली वाहन नंबर प्लेटविना होती,तसेच आता पर्यंत त्या ट्रॅक्टर च्या मालकांची ओळख पटलेली नाही. यामुळे या अवैध उत्खननाच्या मागे कोणत्या " मोठ्या व्यक्ती " चा हात आहे, याबाबत तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
ग्रामसभेने पोलीस व महसूल प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप FIR दाखल झाल्याचे समजलेले नाही, ही बाब प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
झेंडेपार व सोहले परिसरात लोहखनिज उत्खननासाठी यापूर्वी जनसुनावण्या झाल्या असल्या, तरी ग्रामसभेचा स्पष्ट आणि ठाम विरोध कायम आहे. “ हे जंगल आमचे जीवनाधार आहे; आमची संस्कृती,उपजीविका आणि अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे.आम्ही जंगल देणार नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तरीही कंपन्यांकडून लोकांना आमिष दाखवून कामावर घेणे,तसेच ग्रामपंचायतची NOC नसतानाही उत्खनन सुरू करणे, हा थेट कायद्याचा भंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायत नांदळी अंतर्गत सोहले व झेंडेपार येथे लोहखनिजासाठी प्रक्रिया सुरू असताना, ग्रामसभा व ग्रामपंचायत यांची अधिकृत संमती नसतानाही उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप ग्रामस्थांमध्ये उसळला असून अखेर ग्रामसभेने स्वतः पुढाकार घेत अवैध उत्खनन करणारे मजूर व ट्रॅक्टर जप्त करून आपली एकजूट आणि ताकद दाखवून दिली.झेंडेपार ग्रामसभेने पेसा कायदा अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ही धडक कारवाई केली आहे.
“ जबरदस्तीने जंगलात घुसून आमची मालमत्ता लुटणाऱ्यांना आम्ही कदापि सोडणार नाही.ग्रामपंचायतची NOC नाही, ग्रामसभेचा पूर्ण विरोध आहे.तरीही जे कोणी हे कृत्य करत असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा ग्रामसभेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या जप्त केलेली ट्रॅक्टर ग्रामसभेच्या ताब्यात असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली आहे. मात्र FIR नोंद न होणे, दोषींची ओळख न पटणे आणि प्रशासनाचे मौन यामुळे जनआक्रोश अधिक तीव्र होत आहे.ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि अवैध उत्खनन कायमस्वरूपी थांबत नाही, तोपर्यंत झेंडेपार ग्रामसभेचा जल - जंगल–जमिनीचा लढा अधिक तीव्र केला जाईल.

