एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता - बाळ मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ ; गंभीर गर्भवती महिलांना अहेरी किंवा गडचिरोली येथे रेफरमुळे त्यांचा जीव धोक्यात.
📍25 अतिरिक्त सीएस,निवासी वैद्यकीय अधिकारी नाहीत गडचिरोली जिल्ह्यातील च्या 7 ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञ नाही कसा होईल उपचार ?
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्चुन भव्य शासकीय रुग्णालये उभारण्यात आली आहेत. विविध आरोग्य योजना, सुविधा आणि आधुनिक इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी प्रत्यक्षात गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे अपयश पुन्हा एकदा उघड झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता - बाळ मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञच नसल्याने गर्भवती महिलांवर उपचार कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागात रुग्णसेवेसाठी एकूण १५ शासकीय रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, तसेच कुरखेडा, अहेरी व आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. अहेरी येथे नव्याने महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.आरोग्य विभागातर्फे सेवांबाबत प्रभावी जनजागृती नसल्याने दुर्गम,अतिदुर्गम भागातील अनेक नागरिक पुजाऱ्याकडे जाऊन उपचार करतात.
चामोर्शी,मुलचेरा,एटापल्ली,भामरागड,सिरोंचा,धानोरा, देसाईगंज,कोरची व आष्टी अशा नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत.यापैकी गडचिरोली,अहेरी, आरमोरी,धानोरा व चामोर्शी या पाच ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती असून तेथे महिलांना उपचार मिळत आहेत.उर्वरित 7 ग्रामीण रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञांचा पूर्णतः अभाव आहे.त्यामुळे गंभीर गर्भवती महिलांना अहेरी किंवा गडचिरोली येथे रेफर केले जात असून त्यांचा जीव धोक्यात येत आहे.डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण १५ रुग्णालयात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ४१ पदे मंजुर आहेत. यापैकी १६ पदे कार्यरत असून तब्बल २५ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
जिल्ह्यात एकूण नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यापैकी धानोरा, भामरागड व चामोर्शी या तीन रुग्णालयांना आयपीएचएस दर्जा देण्यात आला आहे. या रुग्णालयांत स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व २ भूलतज्ज्ञांची पदे मंजूर असून प्रत्यक्षात भामरागड येथील सर्व पदे रिक्त आहेत. परिणामी येथे सिझर प्रसूतीची सुविधा नसून गंभीर गर्भवती महिलांना अहेरी किंवा गडचिरोली येथे पाठवले जाते. दरम्यान, गडचिरोली येथे गर्भवती महिला पोहोचेपर्यंत विलंब होत असल्याने दोघांच्याही जीवाला धोका होत असतो.
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी ऐनवेळी गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात संपूर्ण जिल्हाभरातून गर्भवती महिलांना रेफर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रूग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत. मात्र खाटांच्या क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण दाखल होत असल्याने येथील सुविधाही तोकड्या पडत आहेत.
अहेरी येथे नव्यानेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयाला आयपीएचएसचा दर्जा दिल्यास येथे सिजर प्रसूती करणारे तज्ज्ञ डॉक्टर नियमित उपलब्ध होऊ शकतात. कारण अशा डॉक्टरांना मासिक वेतन ७० हजार रूपये व प्रति सिजर प्रसूतीला ४ हजार रूपये देय असतात.
" जिल्हा आरोग्य विभागातील वर्ग १ व वर्ग २ मधील रिक्त अधिकाऱ्यांची तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबतची संपूर्ण माहिती शासन व वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे." - वर्षा लहाडे,जिल्हा शल्यचिकित्सक,गडचिरोली

