तालुक्यातील 3 गावातील 3 तरुणांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवसी मृत्यू.
एस.के.24 तास
गोंदिया : आजचा दिवस गुरुवार ८ जानेवारी हा अर्जुनी-मोरगाव तालुका वासियांसाठी अत्यंत दु:खद आणि हादरवणारा ठरला. तालुक्यात तीन गावातील तीन तरुणांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवसी ८ जानेवारीला मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील ताडगांव येथील संदिप वसंत नाकाडे या ४२ वर्षीय तरुणाने अर्जुनी - मोरगाव रेल्वे स्टेशन परिसरात ८ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास गोंदिया – चंद्रपुर कडे जाणा-या मालवाहू रेल्वे गाडी समोर येवून आपले आयुष्य संपविले. संदिप नाकाडे हा विवाहीत युवक अर्जुनी-मोर येथे कृषी सेवा केंद्र चालवीत असल्याची माहिती आहे.
दुस-या एका घटनेत अर्जुनी-मोर. तालुक्यातील धाबेटेकडी / आदर्श येथील नंदेश्वर गजानन कापगते या ३५ वर्षीय विवाहित युवकाचा शेतातील विद्युत डिपी जवळ विद्युत प्रवाहाचा धक्का लागुन शेतात जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यामुळे धाबेटेकडी गावात शोककळा पसरली आहे.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी-मोर. ग्रामीण रुग्णालयात आणले असता. मृतकाचे नातेवाईक, कुटुंबीय यांनी मोठी गर्दी करुन शोक व्यक्त केला. या दोन्ही घटनेचा सखोल तपास अर्जुनी-मोर. पोलीस करीत आहेत.
तिसऱ्या एका घटनेत अर्जुनी-मोर तालुक्यातील मोरगांव येथील अविवाहित दुर्गेश वामन चौधरी वय २८ वर्षे हा युवक काही कामा निमित्त साकोली तालुक्यातील नातेवाईकाकडे दुचाकीने गेला होता. ८ जानेवारी रोजी साकोली तालुक्यातील चारगांव फाट्याजवळ दुपारी ३:३० वाजेच्या ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुर्गेश चौधरी जागीच ठार झाला. अर्जुनी-मोर तालुक्यातील या तिन्ही घटनांमुळे संपुर्ण तालुका हादरुन गेला असुन संपुर्ण तालुक्यासह तिन्ही गावात शोककळा पसरली आहे.
झाडावरुन पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाडावर डिंक जमा करताना खाली पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बिहिरीया येथे बुधवारी ही घटना घडली.
मेघराज आत्माराम जमईवार (४२, रा. बिहिरीया) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सायंकाळी ४ :२६ वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतात झाडावर डिंक जमा करण्यासाठी चढले होते. यावेळी अचानक तोल जाऊन ते झाडावरून खाली पडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच गुरुवार ८ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिरोडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाची चौकशी पोलिस नायक श्रीरामे करीत आहेत.