चंद्रपूर मध्ये भाजप चे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रचार फलकावरील छायाचित्राला कुणीतरी अज्ञात इसमाने शेण फासल्याने खळबळ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर उमेदवारांच्या यादीतील १७ नावे बदलून इतरांना उमेदवारी दिल्याने महानगर जिल्हाध्यक्ष पद गमावणारे भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रचार फलकावरील छायाचित्राला कुणीतरी अज्ञात इसमाने शेण फासल्याने खळबळ उडाली आहे.
प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली उमेदवारांनी यादी बदलल्याने शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रचार फलकावर शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. तुकूम प्रभाग क्रमांक एक मधील रामकृष्ण सोसायटी परिसरात सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचे होर्डिंग आहे. याच एका होर्डिंगवर शेण फेकल्याचे आज गुरूवारी सकाळी दिसून आले.
यातील सुभाष कासनगोट्टूवार यांच्याच प्रतिमेवर हे शेण फेकले गेले.भाजप प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवारांच्या यादीतील सतरा उमेदवार बदलण्याचा प्रताप सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात आले होते. ज्या उमेदवारांना यांनी कापले, त्यांचा सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर रोष आहे. शेण फेकण्याची कृती त्यातून तर झाली नसावी ना,अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात मतभेद आणि मनभे वाढत चालले आहे. भाजप हा अनुशासनप्रिय पक्ष आहे. मात्र मागील काही दिवसात भाजपात इतका गोंधळ दिसत आहे की मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनाही नेते व कार्यकर्त्यांना सावरणे कठीण झाले आहे.
बुधवारी तर महसूलमंत्री बावणकुळे यांच्या जाहीर सभेत मंचावर बंडखोराने धडक दिली होती.तसेच इंदिरा नगर येथे बावणकुळे सभा घेण्यासाठी आले असता रस्त्यावर एबी फाॅर्म चोर,दोनशे युनिट वीज अशा घोषणा देण्यात आल्या.त्यामुळे वातावरण अधिक गढूळ झाले आहे.
त्यातच आज प्रदेशाध्यक्ष,रवींद्र चव्हाण यांचीही सभा रद्द झाली आहे.ppचव्हाण यांची सभा रद्द होण्यामागचे कारण बंडखोरांचा जाहीर सभेत गोंधळ यामुळे की केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांचा मुंबई दौरा यामुळे आहे हे कळायला मार्ग नाही.
भाजपमधील हा गोंधळ आता एकमेकांच्या प्रचार फलकावर शेण फेकण्यापर्यंत गेला आहे. येत्या काळात हा गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

