१४ नक्षलवाद्यांना कंठस्नान मृतांमध्ये मोठ्या नेत्यांचा समावेश ; आणखी काही मोठ्या फळीतील नेत्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता

१४ नक्षलवाद्यांना कंठस्नान मृतांमध्ये मोठ्या नेत्यांचा समावेश ; आणखी काही मोठ्या फळीतील नेत्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता 


एस.के.24 तास


सुकमा (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा गड मानल्या जाणाऱ्या बस्तर विभागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत जवानांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 


यामध्ये आठ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी नेता आणि कोंटा एरिया कमिटीचा सचिव वेट्टी मुका ऊर्फ ‘मंगडू’ याचाही समावेश आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला धक्का बसला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा आणि बिजापूरच्या दुर्गम सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांची मोठी फळी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) पथकांनी शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास शोधमोहीम हाती घेतली. बिजापूरच्या हद्दीत जवानांची पहिली चकमक उडाली.


त्यानंतर सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुकमा जिल्ह्यातील जंगलात जवानांवर नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. घनदाट जंगल आणि डोंगरदऱ्यांचा आडोसा घेत नक्षलवाद्यांनी जवानांना घेरण्याचा प्रयत्न केला.जवानांच्या प्रत्युत्तरापुढे नक्षलवाद्यांचा निभाव लागला नाही.सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर नक्षलवाद्यांनी माघार घेत पळ काढला.


या मोहिमेनंतर जंगलात राबवलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये सुकमा जिल्ह्यात १२, तर बिजापूरच्या सीमेवर २ नक्षलवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये वेट्टी मुका ऊर्फ मंगडू याची ओळख पटली असून, तो अनेक घातपाती कारवायांमध्ये पोलिसांना हवा होता. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठार झालेल्यांमध्ये आणखी काही मोठ्या फळीतील नेत्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.


घटनेनंतर संपूर्ण परिसराला जवानांनी वेढा घातला असून घटनास्थळावरून एके-४७, इन्सास आणि एसएलआर यांसारख्या घातक स्वयंचलित रायफलींसह मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. परिसरात अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !