गडचिरोलीत रंगणार " कोया कृषी कुंभ " जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजनाचा आढावा.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गडचिरोली येथे " कोया कृषी कुंभ " २०२५ - २६ या जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज या महोत्सवाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक पार पडली.
ज्यामध्ये आयोजनाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेतीसंबंधीत आधुनिक तंत्रज्ञान व शासनाच्या कृषी संलग्न योजना पोहचविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, मत्स विकासचे सहायक आयुक्त समिर डोंगरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले,जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
हा कृषी महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत " आत्मा " यंत्रणेमार्फत याचे नियोजन केले जात आहे. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे,शेतकरी,कृषी शास्त्रज्ञ आणि विपणन साखळी यांच्यात समन्वय प्रस्थापित करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री साखळी विकसित करून मध्यस्थांची गरज कमी करणे.
परिसंवादांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे, हा या 'कोया कृषी कुंभ' आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे. यातील 'कोया' हा शब्द येथील आदिवासी समुदायाशी संबंधीत असून इथल्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरेने चालत आलेल्या जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करत असल्याने 'कोया कृषी कुंभ' असे या कृषी महोत्सवाला नाव देण्यात आले असल्याचे प्रीती हिरळकर यांनी यावेळी सांगितले.
विविध उपक्रमांची रेलचेल : -
कृषी प्रदर्शनात शासकीय दालने,विविध कृषी कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि शेतीविषयक प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. सुमारे ३०० स्टॉल्सची उभारणी येथे केली जाणार आहे. कृषी प्रक्रिया आणि कृषीपूरक व्यवसायांवर आधारित तज्ज्ञांच्या चर्चासत्रांचे याप्रसंगी आयोजन केले जाईल.तसेच जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव या महोत्सवात केला जाईल.सोबतच धान्य महोत्सव आणि खरेदीदार - विक्रेता संमेलनाद्वारे शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळवून दिली जाईल.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये सनियंत्रण व समन्वय समिती,वित्त व लेखा समिती, स्वागत व उद्घाटन समिती यांसारख्या २० पेक्षा जास्त समित्यांचा समावेश आहे.

