अवैध सावकारी,किडनी विक्री रॅकेटचा तपास मागणीसाठी शेतकरी या पदयात्रेत सहभागी.
अवैध सावकारांविरोधात रोष तीव्र होईल. - बच्चू कडू
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
नागभीड : तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांच्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाच्या पृष्ठभूमीवर अवैध सावकारी, किडनी विक्री रॅकेटचा तपास,शेतकर्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला बोनस मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शनिवार, 3 जानेवारी रोजी दुपारी 12:00.वाजता जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा नागभीड शहरातील विविध मार्गांनी 10 किलोमीटर अंतर पार करीत, राम मंदिर चौकात पोहोचला.येथे 15 मिनिटे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.मोर्चा दरम्यान बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथून या मोर्चाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.रोशन कुळे यांच्या निवासस्थान पासून मोर्चाला प्रारंभ झाला.जनतेने या संघर्षात सहभागी व्हावे,असे आवाहन बच्चू कडू यांनी मोर्चाच्या सुरुवातीलाच केले होते. हा जनाक्रोश मोर्चा दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सुरू होता. आयोजकांच्या माहितीनुसार,प्रत्यक्ष मोर्चा साधारण 2 तास चालला.हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मोर्चा दरम्यान शेतकर्यांनी जय जवान,जय किसान, रोशन कुळे यांना न्याय द्या, शेतकर्यांची कर्जमाफी करा,शेतमालाला बोनस द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा अशा घोषणा दिल्या गेल्या. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात माजी आमदार वामन चटप, रोशन कुळे यांची आई,पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते.मोर्चात अमरावती,चंद्रपूर,नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते.
अवैध सावकारांविरोधात रोष तीव्र होईल : बच्चू कडू
मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना बच्चू कडू यांनी,रोशन कुळे यांनी धाडस दाखवून अवैध सावकारी आणि किडनी विक्री रॅकेट समोर आणले. पण इतक्या गंभीर संकटातही स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, पालकमंत्री किंवा खासदारांपैकी कुणीही रोशनच्या कुटुंबाला भेट देऊन धीर दिला नाही,ही मोठी शोकांतिका आहे.रोशन कडून घेतलेली रक्कम वेळेत परत न केल्यास अवैध सावकारांविरोधात जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
सरकारला आम्ही 1 महिन्याचा 'अल्टिमेटम' दिला आहे.या कालावधीत ठोस निर्णय झाला नाही, तर 19 फेब्रुवारीपासून विदर्भातील प्रत्येक तालुक्यात 10 दिवसांची पदयात्रा काढली जाईल.
30 जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास शेतकरी अधिक आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील, असा इशाराही कडू यांनी दिला.

