गडचिरोली येथील दुबईत पर्यटनासाठी गेलेले बुरेवार कुटुंब विमान सेवा विस्कळीत झाल्याने तिथेच अडकले. 📍जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला संदेश पाठवून मायदेशी परतण्यासाठी मदतीची आर्त हाक.

गडचिरोली येथील दुबईत पर्यटनासाठी गेलेले बुरेवार कुटुंब विमान सेवा विस्कळीत झाल्याने तिथेच अडकले. 


📍जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला संदेश पाठवून मायदेशी परतण्यासाठी मदतीची आर्त हाक.


एस.के.24 तास 


गडचिरोली : अमेरिका,इस्राईल आणि इराण यांच्यात उफाळलेल्या युद्धजन्य संघर्षाचे सावट आता थेट गडचिरोलीतील एका कुटुंबावर पडले आहे.दुबईत पर्यटनासाठी गेलेले गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब विमान सेवा विस्कळीत झाल्याने तिथेच अडकून पडले असून,त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला संदेश पाठवून मायदेशी परतण्यासाठी मदतीची आर्त हाक दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,गडचिरोली येथील रहिवासी असलेले नील बुरेवार हे आपले वडील सुनील बुरेवार, आई मेघा बुरेवार आणि बहीण मयुरा बुरेवार यांच्यासह २५ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजित वेळापत्रकानुसार, हे कुटुंब ५ मार्च २०२६ रोजी इंडिगोच्या विमान क्र. " ६ ई १४६६ " ने दुबईहून हैदराबादमार्गे नागपूरला परतणार होते.आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध आले असून अनेक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे हे कुटुंब सध्या दुबईतील " आवरी डेरा "  हॉटेलमध्ये अडकले आहे.


युद्धामुळे उद्भवलेली आणीबाणीची स्थिती आणि विमानतळांवरील अनिश्चितता यामुळे बुरेवार कुटुंब चिंतेत आहे. आम्ही सध्या सुरक्षित असलो तरी, युद्धाच्या बातम्या आणि रद्द होणारी उड्डाणे यामुळे भविष्यातील सुरक्षेबद्दल मनात प्रचंड भीती आहे, असा संदेश नील बुरेवार यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे. या संदेशात त्यांनी आपल्या मुक्कामाचा पत्ता आणि प्रवासाचा सविस्तर तपशील दिला असून,केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करून आम्हाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती केली आहे.


गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या संदेशाची तातडीने दखल घेतली असून हे प्रकरण राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुबईतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या कुटुंबाला आवश्यक ती मदत आणि सुरक्षिततेची खात्री देण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आखाती देशांमधील या संघर्षामुळे भारतातील अनेक पर्यटक तिथे अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बुरेवार कुटुंबाच्या सुरक्षित परतीसाठी आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष प्रशासकीय हालचालींकडे लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !