कारगील चौक परिसरातील मनमिळावू व्यावसायिकाचा गिझर च्या करंट ने 24 वर्षीय युवकाचा मृत्यू.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.घरातील गिझरचा करंट लागल्याने कारगील चौक परिसरातील एका तरुण आणि मनमिळावू व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.जयंत मनोहर भांडेकर वय,24 वर्ष असे या मृत तरुणाचे नाव असून,या घटनेमुळे संपूर्ण मिरची गल्ली आणि कारगील चौक परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार जयंत भांडेकर हे शहरातील प्रसिद्ध " जयंत आटा चक्की " चे संचालक होते.नेहमी प्रमाणे दिवसभराचे काम आटोपून ते काल रात्री घरी परतले.आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता, गझरच्या विद्युत प्रवाहाचा (इलेक्ट्रिक शॉक) त्यांना जोरदार झटका बसला.
बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी पाहिले असता,जयंत हे बाथरूममध्ये निपचित अवस्थेत आढळून आले.त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.जयंत भांडेकर हे केवळ एक कष्टकरी व्यावसायिक होते.
ते अत्यंत साध्या आणि मनमिळावू स्वभावाचे होते. परिसरातील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या अशा अकाली आणि अनपेक्षित निधनामुळे भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा आहे.

