कष्टाच्या कमाईवर डल्ला! बँक कर्मचारी असल्याचे सांगून भाजीपाला विक्रेत्या बहिणींची ४८ लाखांची फसवणूक ; खासगी बँकेच्या माजी कर्मचाऱ्याचे कारस्थान.
📍आरोपी मिथुन गायकवाड ला अटक न्यायालयाने त्यास २८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिवसभर उन्हातान्हात बसून, घाम गाळून कमावलेला एक-एक पैसा भविष्यासाठी साठवून ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या गडचिरोलीतील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींना एका खाजगी बँकेच्या '' सेल्स ऑफिसर '' ने आपल्या जाळ्यात ओढले आणि पाहता पाहता त्यांच्या आयुष्याची तब्बल ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांची कमाई लंपास केली.या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मिथुन प्रभाकर गायकवाड,रा.खेडेगाव,ता.कुरखेडा यास अटक केली आहे.
गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले की,जुली मारोती शिरपूरकर (३५) व सविता पोहनकर या दोघी बहिणी गडचिरोलीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.आरोपी मिथुन गायकवाड हा एका खासगी बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता.तो दोन्ही बहिणींकडे गेला. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघींच्याही नावाने त्याने एचडीएफसी आणि एक्सिस बँकेत खाते उघडून दिले.त्यात दोघींनीही व्यवसायातून जमा केलेली रक्कम भरली. मात्र,खात्याचे सर्व नियंत्रण मिथुनने आपल्याकडेच ठेवले. हाच फायदा घेत तो दोन्ही बहिणींना भुलथापा देत होता.
अशातच मिथुनने दोघींना कुठलीही माहिती न देता त्यांच्या खात्यातून २८ लाख ५४ हजार रुपये काढून घेतले. एवढेच नाही तर त्यांच्या परवानगीविना ८ लाख रुपये आणि ऑनलाईन स्वरुपात ११ लाख ८३ हजार ७८७ रुपयेदेखील त्याने वापरले. अशाप्रकारे एकूण ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांनी मिथुन गायकवाडने दोन्ही बहिणींची फसवणूक केली.मिथुन हा पूर्वी एचडीएफसी बँकेत कार्यरत होता.
तेथून काढल्यानंतर तो अॅक्सिस बँकेत रुजू झाला.परंतु तेथूनही नोकरी गेल्यानंतर सध्या तो कुरखेडा येथील एका पतसंस्थेचा अभिकर्ता म्हणून कार्यरत होता, अशी माहिती आहे.आपल्या खात्यातून रक्कम गायब होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही बहिणींना संशय आला. त्यांनी मिथुनला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.त्यामुळे संशय आणखी बळावला आणि जुली शिरपूरकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वातील चमूने आरोपी मिथुन गायकवाड यास अटक केली. त्याला शुक्रवारी(ता.२४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

