रायपेटा गावात पाणी, रस्ते व नाली समस्यांनी नागरिक त्रस्त. - भाकपाची मागणी.

रायपेटा गावात पाणी, रस्ते व नाली समस्यांनी नागरिक त्रस्त. - भाकपाची मागणी.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत घरकापेटा अंतर्गत येणाऱ्या रायपेटा गावात सध्या मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत, तर नळयोजनेतून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असून महिलांवर व वृद्धांवर याचा मोठा परिणाम होत आहे.


तसेच रायपेटा गावातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. शाळकरी मुले व रुग्णांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.गावातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) च्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोटकूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


रवि बारसागंडी यांनी सांगितले की, “रायपेटा गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे व नाल्यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. अन्यथा भाकपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”ग्रामस्थांनीही प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !