मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला. 📍3 महिला व 1 पुरुष जखमी झाले असून, एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक.

मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला.


📍3 महिला व 1 पुरुष जखमी झाले असून, एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक.


एस.के.24 तास 


गोंदिया : देवरी तालुक्यातील डवकी परिसरात जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकारात तीन महिला व एक पुरुष जखमी झाले असून, एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


जखमींमध्ये जयवंता लक्ष्मण बागडे (७०), धनंजय हिरालाल सोरले (५८), पूजा अनिल नुरेटी (१८) आणि जयश्री ऋषिपाल उईके (१६) यांचा समावेश आहे. त्यापैकी जयवंता बागडे या सर्वाधिक जखमी झाल्या असून त्यांच्यावर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


माहितीनुसार, जयवंता बागडे या शुक्रवारी पहाटे जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेल्या होत्या. परिसरात शांत वातावरण असताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्याने त्या घाबरून मदतीसाठी धावू लागल्या. यावेळी जवळील पोल्ट्री फार्मकडे त्या गेल्या असता.


तेथे उपस्थित धनंजय सोरले यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक मधमाश्यांनी त्यांनाही लक्ष्य केल्याने तेही जखमी झाले गावाहून डवकीटोला दिशेने येत असलेल्या पूजा नुरेटी आणि जयश्री उईके या दोन तरुणींवरही मधमाश्यांनी हल्ला केला. प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःचा बचाव केला.


घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारांनंतर पूजा नुरेटी आणि जयश्री उईके यांना घरी सोडण्यात आले, तर जयवंता बागडे आणि धनंजय सोरले यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मोहफूल वेचण्याच्या हंगामात जंगल परिसरात जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, तसेच प्रशासनाने जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !