जिमलगठ्ठा जंगलात आगीचा भीषण तांडव ; वनविभागाच्या दुर्लक्षावर सवाल...!
📍वन्यजीव, गावकरी आणि मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात; तात्काळ कारवाईची मागणी..!
एस.के.24 तास
सिरोंचा : सिरोंचा वनविभागांतर्गत जिमलगठ्ठा वनपरिक्षेत्रात लागलेल्या भीषण जंगलआगीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेपणपल्ली–जिमलगठ्ठा राष्ट्रीय महामार्ग ३५३C लगत अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या जंगलात ही आग भडकली असून, आगीने अक्षरशः तांडव मांडल्याचे चित्र दिसून येत आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात मौल्यवान वनसंपत्ती जळून खाक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्यावरणीय नुकसानही गंभीर स्वरूपाचे असून, जैवविविधतेवर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या परिसरालगत गुंडेरा व अर्कपल्ली ही गावे असून, तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसह वन्यप्राण्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आग लागल्यानंतरही वनविभागाकडून त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगीचा फैलाव वाढत असून परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. आगीच्या विळख्यात सापडलेल्या जंगलामुळे वन्यजीवांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता असून, मानव- वन्यजीव संघर्षाचीही भीती व्यक्त केली जात आहे.
जिमलगठ्ठा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तात्काळ अग्निशमन उपाययोजना राबवून आग नियंत्रणात आणावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा, ही आग आणखी भडकून संपूर्ण परिसरासाठी मोठे पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. “वनविभागाने तातडीने हालचाल करून आग आटोक्यात आणावी, अन्यथा मोठी हानी टाळता येणार नाही,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

