धक्कादायक सरकारी निधी चक्क व्याजाने वाटला ; चिखलीच्या महिला ग्रामसचिव निलंबित..!
📍" अवैध सावकारी " चा गुन्हा दाखल होणार का ?
एस.के.24 तास
कुरखेडा : शासकीय निधीचा विनियोग विकासकामांसाठी करण्याऐवजी तो चक्क खासगी व्यक्तींना व्याजाने वाटल्याचा खळबळजनक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. या गंभीर गैरप्रकारामुळे चिखली (ता.कुरखेडा) येथील ग्रामपंचायत अधिकारी रोशनी सिद्धार्थ शहारे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
नेमके प्रकरण काय ?
मानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१५ - १६ या वर्षात " गौण वनोपज उपभोग " योजनेसाठी १२ लाख रुपयांचा बीज भांडवल निधी प्राप्त झाला होता. यामध्ये चिचटोला गाव ४ लाख रुपये, तर चिखली गाव ८ लाख रुपये. हा निधी नेमका कोणत्या बाबींवर खर्च करायचा याचे स्पष्ट निर्देश असतांनाही, रोशनी शहारे यांनी कर्तव्यात कसूर केली.
गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल चौकशीत असे निष्पन्न झाले की, हा निधी सरकारी कामासाठी न वापरता गावातील काही इसमांना व्याजाने देण्यात आला होता. कायदेशीर कारवाई आणि नियम हा प्रकार " महाराष्ट्र जिल्हा परिषद,जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ " च्या नियम ३ चा थेट भंग असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून 'महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपील) नियम १९६४' नुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन काळातील निर्बंध रोशनी शहारे यांच्यावर निलंबन काळात खालील अटी लादण्यात आल्या आहेत:
१) मुख्यालय :- त्यांचे मुख्यालय गडचिरोली पंचायत समिती निश्चित करण्यात आले असून, सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
२) निर्वाह भत्ता : - त्यांना केवळ नियमनूसार 'निर्वाह भत्ता' मिळेल. मात्र, त्यासाठी त्यांना दरमहा 'मी कोणत्याही खासगी नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेलो नाही' असे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
सरकारी निधी व्याजाने वाटल्याचे समोर आल्याने, आता संबंधित अधिकाऱ्यावर " अवैध सावकारी " चा गुन्हा दाखल होणार का ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट कारभाराला चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.

