गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी संस्कृतीवर घाला ?
📍" चमत्कारी " चंगाई च्या नावाखाली भामरागड तालुक्यात धर्मांतराचा उघड खेळ.
एस.के.24 तास
भामरागड : गडचिरोली जिल्ह्याला आदिवासी संस्कृती आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे.अलीकडच्या काळात दुर्गम आदिवासी क्षेत्रांमध्ये धर्मांतराचे लोण वेगाने पसरताना दिसत आहे.भामरागड तालुक्यातील मेडेपल्ली परिसरात लावण्यात आलेल्या एका वादग्रस्त बॅनरमुळे आता नवा वाद उफाळून आला असून,आदिवासी बांधवांना आजार बरे करण्याच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माकडे ओढण्याचे जाळे विणले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
काय आहे नेमका प्रकार ?
भामरागडच्या मेडपल्ली - लाहेरी रोडवर " गॉड ग्रेस प्रेयर चर्च " तर्फे 6 आणि 7 एप्रिल 2026 रोजी एका भव्य 'वार्षिक चंगाई महासंमेलना चे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाच्या जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर " बिमारी के लिए विशेष प्रार्थना की जायेगी " (आजारांसाठी विशेष प्रार्थना केली जाईल) असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद देणारे हे दावे केवळ गरीब आणि अडाणी आदिवासी बांधवांना आकर्षित करण्यासाठी केले जात असल्याचे बोलले जात आहे.
आमिषाचे राजकारण आणि लोप पावणारी संस्कृती : -
हिंदभट्टी फाटा आणि आसपासच्या परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे आदिवासी समाजात चिंतेचे वातावरण आहे. आरोप केला जात आहे की, जे रुग्ण आधुनिक वैद्यकीय उपचारांपासून लांब आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना " प्रार्थनेने आजार बरे होतील " असे आमिष दाखवले जाते.
या प्रक्रियेतून हळूहळू आदिवासी बांधवांना त्यांच्या मूळ प्रकृती पूजक संस्कृतीपासून तोडून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केले जात आहे. यामुळे आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा आणि त्यांची मूळ ओळख नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष ?
अशा प्रकारे " चमत्कारी " उपचारांचे दावे करून लोकांना गोळा करणे हे जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन ठरू शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुर्गम भागात चालणाऱ्या या हालचालींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धर्मांतर करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचे स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे.
आदिवासी समाजाची मागणी : -
आपली संस्कृती आणि ओळख जपण्यासाठी आदिवासी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेण्याची गरज व्यक्त केली आहे. "आजारावर इलाज डॉक्टरांनी करावा, प्रार्थनेचा वापर धर्मांतरासाठी होणे चुकीचे आहे," अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. आता पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी या वादग्रस्त महासंमेलनावर काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

