संघर्षातून यशाकडे स्नेहा चौधरीची पोलीस भरतीत झेप
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : जिद्द,मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे खालवसपेठ येथील स्नेहा उमाजी चौधरी. अतिशय कठीण परिस्थितीतून वाटचाल करत स्नेहाने चंद्रपूर पोलीस शिपाई भरतीत पहिल्याच प्रयत्नात सातवी मेरिट मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्नेहाचे बालपण अत्यंत संघर्षमय होते.ती आईच्या पोटात अवघ्या सहा महिन्यांची असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक संकटे आली. आई गीता चौधरी यांनी दुसरे लग्न केल्यानंतर स्नेहाचे संगोपन तिचे मामा चंद्रदीप शेंडे (होमगार्ड - मुल पोलीस ठाणे व शेतकरी), मामी आशा शेंडे, प्रविण शेंडे आणि आजी रुखमाबाई शेंडे यांनी केले.
मामा-मामी यांनी स्नेहाला स्वतःच्या मुलीसारखे प्रेम देत तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे स्नेहाने शिक्षणासोबत पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. ती एक उत्कृष्ट वक्ता असून विविध स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे.
आपल्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्नेहाने पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरतीत यश मिळवले. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण खालवसपेठ गाव आणि माळी समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
स्नेहाची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर यश निश्चित मिळते,” हा संदेश ती देत आहे.
खालवसपेठची कन्या - चंद्रपूर पोलीस दलाचा अभिमान.
माळी समाजाची कन्या - समाजाचा गौरव.
स्नेहाला पुढील आयुष्यासाठी आणि सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

