नीट परीक्षेत मोबाईलद्वारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन कॉपी करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांवर गडचिरोली पोलिसांनी केले गुन्हे दाखल. 📍एक विद्यार्थिनी नागभिड येथील,तर दुसरा विद्यार्थी आष्टी.

नीट परीक्षेत मोबाईलद्वारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन कॉपी करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांवर गडचिरोली पोलिसांनी केले गुन्हे दाखल.


📍एक विद्यार्थिनी नागभिड येथील,तर दुसरा विद्यार्थी आष्टी.


एस.के.24 तास 


गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेत मोबाईलद्वारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.यापैकी एक विद्यार्थिनी नागभिड येथील, तर दुसरा विद्यार्थी आष्टी येथील आहे. पोलिसांची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून विद्यार्थ्यांनी परीक्षाखोलीत मोबाईल नेत्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत ३ मे रोजी वैद्यकीय अभ्यायक्रमासाठी 'नीट' परीक्षा घेण्यात आली. गडचिरोली शहरात या परीक्षेची केंद्रे होती. त्यापैकी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर ३६० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती.


दुपारी २ ते संध्याकाळी ५ अशी परीक्षेची वेळ होती. परीक्षा सुरु असताना दुपारी ३.४० वाजताच्या सुमारास खोली क्रमांक ६ मधील पर्यवेक्षक राजेश पाटील आणि राखी मुधोळकर यांना एक विद्यार्थिनी संशयास्पद हालचाल करीत असल्याचे लक्षात आले. 


त्यांनी तपासणी केली असता त्या विद्यार्थिनीकडे एक आकाशी रंगाचा मोबाईल आढळून आला. शिवाय तिने यंदाचा पेपर आपल्या वस्त्रात लपवून ठेवला होता आणि मागील वर्षीचा पेपर मुख्य पृष्ठा जोडून ती कॉपी करीत होती.


दुसरे प्रकरणही असेच आहे. शहरातील गोकुळनगर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी मोबाईल घेऊन बसला होता. दुपारी २.२७ वाजताच्या सुमारास पर्यवेक्षक मनिष बानबले यांनी त्यास मोबाईलसह पकडले. परीक्षा संपल्यानंतर मोबाईलची तपासणी केली असता त्याच्या गॅलरीत प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. त्याने एआयला प्रश्न पाठवून उत्तरे प्राप्त केल्याचे दिसून आले. 


दोन्ही प्रकरणी केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी अरुण मुनघाटे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.त्यानंतर पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांवर सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४ च्या कलम ३(८) आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले.


जप्त केलेले मोबाईल आणि चित्रीकरण पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याविषयीचा तपास सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.कडक सुरक्षा व्यवस्था कसली?


सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षाखोलीत प्रवेश होता. त्यासाठी प्रवेशद्वारावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. नीट परीक्षेत नाक,कान व अन्य ठिकाणचे दागिने,बूट, जास्त खिसे असलेले कपडे घालून जाणे तसेच इतर कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई होती.


केवळ फोटो चिकटवेलेले व अंगठा लावलेले प्रवेश पत्र,दोन फोटो आणि आधार कार्ड हेच आत नेण्यास परवानगी होती.येणाऱ्या विद्यार्थ्याची पोलिस कडक तपासणी करीत होते. परंतु दोन्ही परीक्षा केंद्रावर एवढी ढील कशी होती, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे.





#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !