गडचिरोली जिल्ह्यातील व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर... 📍एटापल्ली तालुक्यातील एका महिलेला विषबाधा तिला वाचवण्यासाठी दुचाकीवर आडवे झोपवून 6 कि.मी.चा खडतर प्रवास ; अखेर महिलेचा मृत्यू.

गडचिरोली जिल्ह्यातील व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर...


📍एटापल्ली तालुक्यातील एका महिलेला विषबाधा तिला वाचवण्यासाठी दुचाकीवर आडवे झोपवून 6 कि.मी.चा खडतर प्रवास ; अखेर महिलेचा मृत्यू.


एस.के.24 तास 


एटापल्ली : एकीकडे प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील एका महिलेला विषबाधा झाल्यानंतर तिला वाचवण्यासाठी नातेवाईकांनी चक्क दुचाकीवर आडवे झोपवून 6 कि.मी.चा खडतर प्रवास केला.


यंत्रणेतील त्रुटी आणि खड्डेमय रस्त्यांच्या शापामुळे महिलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.मीरा गणेश लेखामी (२५, रा.कांदोळी ता.एटापल्ली असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे.


४ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास मीरा यांनी घरगुती कारणावरून विष प्राशन केले होते. दुर्गम भाग असल्याने रुग्णवाहिका मिळण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे नातेवाईकांनी वेळ न घालवता मीरा यांना एका दुचाकीवर आडवे धरले आणि बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने सुसाट वेगाने धाव घेतली.


हा जीवाचा आकांत पाहून रस्त्याने जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने तातडीने आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांना सतर्क केले.बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.गीतांजली खिरटकर यांनी उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती.  


रुग्ण तिथे पोहोचल्यानंतर शरीरातील विषारी द्रव बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘सक्शन मशीन’ची नळीच खराब असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.


नियतीचे फेरे इथेच थांबले नाहीत त्याच वेळी आरोग्य केंद्राचा रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याचे समोर आले. अखेर प्रसंगावधान राखून एका स्थानिक तरुणाने स्वतः रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले आणि वाट काढत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्लीत पोहोचवली. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डॉ.उईके आणि त्यांच्या चमूने मीरा यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 


अर्धा तास ऑक्सिजन आणि सक्शनद्वारे उपचार सुरू होते.उपचारादरम्यान मीरा यांची प्राणज्योत मालवली आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.अपुऱ्या पायाभूत सुविधा,रस्ते, आरोग्य केंद्रातील नादुरुस्त उपकरणे आणि कर्मचारी टंचाई यांमुळे एका महिलेला प्राण गमवावे लागल्याने प्रशासकीय अनास्थेवर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !