काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल ; विजय वडेट्टीवार म्हणाले,पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले.

काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल ; विजय वडेट्टीवार म्हणाले,पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले.


एस.के.24 तास 


नागपूर : राज्यात पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झालीय.1 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरल्यात जमा आहे तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप चर्चा, बैठकांचं सत्र सुरू आहे. 

मात्र अशातच विदर्भात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित नसतानाच आता नगरसेवकांच्या पळवापळवीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. चंद्रपूर- गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेच्या निवडणुकीवरून भाजप- काँग्रेस एकमेकांविरोधात उभे ठाकलेत.

चंद्रपूर - गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी घोडेबाजार तेजीत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 100 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झालेत.भाजपकडून या नगरसेवकांना पर्यटनासाठी रवाना करण्यात आल्याचं बोललं जातंय.. भाजपकडून काँग्रेसचे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील 100 नगरसेवक सोबत घेण्याचे लक्ष्य आहे. 

सध्या पर्यटनासाठी गेलेल्या नगरसेवकांना 5 लाखांचं आगाऊ टोकन रक्कम देण्यात आली असून लक्ष्मीदर्शनाचा आकडा 15 लाखांपर्यंत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.या मतदारसंघात 977 इतकी एकूण मतदारांची संख्या आहे. 

 महायुतीमधील भाजपचे 341, शिवसेनेचे 39, राष्ट्रवादीचे 63 आणि रिपाइंच्या 2 सदस्यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या 293, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 33, शिवसेना UBTचे 25 आणि अपक्ष तसंच इतर 91 सदस्य आहेत.

या मतदारसंघात महापालिकांचे नगरसेवक, नगरपालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्यांचा समावेश आहे, कारण तिन्ही जिल्ह्यांत सध्या निर्वाचित जिल्हा परिषद अस्तित्वात नाही.गेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील भाजपचे उमेदवार डॉ.रामदास आंबटकर काठावरच्या बहुमताने विजयी झाले होते. 

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे बहुमत असलं तरी बहुमताचा आकडा विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यामुळे भाजपकडून यावेळी सावधगिरी बाळगत काँग्रेसच्या नगरसेवकांवर उमेदवार जाहीर होण्याआधीच डाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

त्यांच्याच माध्यमातून काँग्रेसच्या नगरसेवकांना ही पर्यटनवारी घडवण्यात येत असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर- गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी अद्याप महाविकास आघाडी अथवा महायुती यांच्याकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. 

विविध नावांच्या केवळ चर्चा सुरू आहेत.अशातच विजय आपलाच व्हावा या उद्देशाने दोन्ही बाजूंनी तयारी सुरु आहे. यामुळे निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्याने निष्पक्षता धोक्यात आल्याचे चित्र आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !