शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय भूमी अधिग्रहण होणार नाही ” म्हणणाऱ्या सरकारवरच सवाल ; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून ग्रामस्थांचा संताप..!

शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय भूमी अधिग्रहण होणार नाही ” म्हणणाऱ्या सरकारवरच सवाल ; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून ग्रामस्थांचा संताप..!


एस.के.24 तास 


गडचिरोली : तालुक्यातील शिवनीजवळील हिरापूर गावात आज प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूमी सर्वेक्षणावरून मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना, ग्रामसभेची मंजुरी किंवा अधिकृत माहिती न देता काही व्यक्तींनी गावातील शेतजमिनींचे सर्वेक्षण सुरू केल्याने संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांना घेराव घालत जाब विचारला.


अनेक तास गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.अखेर प्रशासनाला ग्रामस्थांसमोर लेखी हमी द्यावी लागली की ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय कुठलाही सर्वे किंवा भूमी अधिग्रहण करण्यात येणार नाही.

         

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही व्यक्ती हिरापूर ग्रामपंचायत परिसरात दाखल झाल्या आणि गावातील शेतजमिनींचे मोजमाप व सर्वेक्षण सुरू केले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी संबंधितांना त्यांची ओळख, सर्वेक्षणाचा उद्देश आणि आदेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,संबंधित व्यक्तींनी “ आम्ही नागपूरवरून आलो असून कलेक्टर साहेबांनी आम्हाला पाठवले आहे ” अशी माहिती दिली.मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत तसेच ओळखपत्र मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 


“ आमचे ओळखपत्र हॉटेलमध्ये राहिले आहे ” असे सांगून त्यांनी स्पष्ट माहिती देण्याचे टाळले.त्यामुळे ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी संबंधितांना तेथेच रोखून धरले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे घटनास्थळी पोहोचले.ग्रामस्थांचा आरोप आहे की तहसीलदारांनी लोकांना “ तुम्हाला माहित नाही का सर्वे कशासाठी चालू आहे ? प्रत्येक गोष्ट सांगावी लागते का ? कलेक्टर साहेबांच्या आदेशावरून सर्वे सुरू आहे, ” असे सांगत सर्वे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. 


मात्र ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलीस यंत्रणेला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत अखेर सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवळील कागदपत्रे ग्रामस्थांना दाखवली.त्या कागदपत्रांमधून गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी विविध ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

       

यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली की गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ उभारण्यासाठी तीन संभाव्य लोकेशन निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिले लोकेशन हिरापूर,शिरपूर,राखी आणि गुरुवळा या गावांच्या परिसरात आहे. दुसरे लोकेशन बोधली गावाच्या परिसरात तर तिसरे लोकेशन राजगाटा गावाजवळ प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. 


ही माहिती समोर येताच ग्रामस्थांचा आक्रोश अधिकच वाढला. “ आम्हाला जमीन द्यायचीच नाही, मग सर्वे कशासाठी?” असा सवाल करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या शेतीवर डोळा ठेवून जबरदस्तीने जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. 

       

या संपूर्ण घटनेदरम्यान ग्रामस्थांनी राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ग्रामस्थांनी सांगितले की यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोलीवासियांना आश्वासन दिले होते, की जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय कुठलाही भूमी अधिग्रहण किंवा भूसंपादन होणार नाही. तसेच स्थानिक आमदार डॉ.मिलींद नरोटे यांनीही पुढाकार घेत “ शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय कोणाचीही जमीन घेतली जाणार नाही,” असे स्पष्टपणे सांगितले होते. 


मात्र त्या आश्वासनांनंतरही आज अचानक गावांमध्ये सर्वेक्षण पथक दाखल झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी लोकांना दिलेला शब्द आता फिरवला आहे काय?” असा आक्रोशपूर्ण सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. एका बाजूला शेतकऱ्यांना विश्वास दिला जातो आणि दुसऱ्या बाजूला गुप्तपणे सर्वेक्षण सुरू केले जाते, असा आरोपही ग्रामस्थांनी केला. 


ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि संताप लक्षात घेता अखेर सर्वेक्षण पथकाला काम थांबवावे लागले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना तोंडी आश्वासन दिले की ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि स्थानिकांच्या मंजुरीशिवाय कोणतेही सर्वेक्षण किंवा भूमी अधिग्रहण केले जाणार नाही. मात्र ग्रामस्थ केवळ तोंडी आश्वासनावर थांबले नाहीत. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि सर्वेक्षण पथकाला ग्रामपंचायतीच्या व्हिजिट बुकमध्ये लेखी स्वरूपात नोंद करण्यास भाग पाडले. 


त्यामध्ये स्थानिक लोकांच्या संमतीशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याची लेखी हमी प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेले पोलीस प्रभारी विनोद चव्हाण यांनी सामंजस्याची भूमिका घेत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तणाव काही प्रमाणात कमी झाला. 


आजच्या या घटनेनंतर हिरापूरसह आसपासच्या अनेक गावांमध्ये भीती, असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली प्रशासन आणि सरकारी यंत्रणा “ साम, दाम,दंड,भेद ” यांचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या संमतीशिवाय कुठलाही भूमी अधिग्रहणाचा प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !