तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या कोंढाळ्यातील मजुराचा मध्यप्रदेशात मृत्यू ; अतिमद्यपान आणि उष्माघाताचा फटका.
एस.के.24 तास
देसाईगंज (वडसा) : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील एका ४५ वर्षीय मजुराचा मध्यप्रदेशातील तेंदूपत्ता फळीवर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रकाश किसन वनस्कार (वय ४५) असे मृतकाचे नाव असून,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू असल्याने, कोंढाळा येथील काही मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी मध्यप्रदेशातील कटंगी परिसरात गेले होते. मागील दोन दिवसांपासून हे मजूर तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम करत होते.बुधवारी (२० मे) सकाळी प्रकाश वनस्कार यांची प्रकृती खालावली.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाचा प्रचंड तडाखा आणि अतिमद्यपान यामुळे प्रकाश वनस्कार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कसंतरी वाटू लागल्याने ते फळीवरच झोपून राहिले. बराच वेळ होऊनही ते उठले नसल्याने सोबतच्या इतर मजुरांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
प्रकाश वनस्कार हे मूळचे कोंढाळा गावचे रहिवासी असून ते गावात न्हावी म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कमावत्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे वनस्कार कुटुंब सध्या शोकसागरात बुडाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो तातडीने कोंढाळा गावी रवाना करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर राज्यात मजुरीसाठी गेलेल्या मजुरांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

