“ नक्षलवाद संपला,तरी विकास अपूर्णच..! अखेर कर्जेली आणि बिराडघाट नाल्यांवर पुलिया कधी उभारणार ? ”
📍चार महिने इंद्रावतीच्या पाण्यात अडकून पडतात ग्रामस्थ ; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास.
एस.के.24 तास
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कर्जेली आणि बिराडघाट नाल्यांवर आजतागायत पुलिया बांधण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने इंद्रावती नदी आणि नाल्यांना पूर आल्यामुळे कर्जेली परिसराचा संपर्क पूर्णपणे तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, तर अनेक गावे अक्षरशः “ जेरबंद ” होऊन राहतात.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विकासकामांच्या अभावामागे नक्षलवादाचे कारण पुढे केले. मात्र आता परिसरातील नक्षल प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असतानाही रस्ते आणि पुलिया यांसारखी मूलभूत विकासकामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत की, “आता आणखी कोणते कारण सांगितले जाणार ? ”
ग्रामस्थांनी सांगितले की, सुमारे वीस वर्षांपूर्वी अहेरी – जिमलगट्टा - देचलीपेठा - कर्जेली - आसरेली मार्गे सिरोंचा पर्यंत नियमित बससेवा सुरू होती. त्या काळातही मार्ग कठीण होता, मात्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध होती. आज परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत, पुलिया नाहीत आणि बससेवाही पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि मजूर यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात कर्जेली आणि बिराडघाट नाल्यांमध्ये पाण्याचा वेग वाढल्याने नागरिकांची ये-जा पूर्णपणे ठप्प होते. अनेकदा रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे शक्य होत नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होतो. ग्रामस्थांना लाकडी होड्या,ट्रॅक्टर किंवा जीव धोक्यात घालणाऱ्या तात्पुरत्या मार्गांचा आधार घ्यावा लागतो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, कर्जेली, आसरेली आणि परिसरातील गावांच्या विकासासाठी मजबूत पुलिया आणि पक्के रस्ते अत्यावश्यक आहेत. जर पुलिया बांधण्यात आल्या तर सिरोंचा आणि अहेरी परिसराशी थेट संपर्क सुलभ होईल आणि हजारो ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची समस्या कायमची सुटू शकते.
ग्रामस्थांनी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मागणी केली आहे की,कर्जेली आणि बिराडघाट नाल्यांवरील पुलिया बांधकामाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे. तसेच जुना बसमार्ग पुन्हा सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यावा.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की,“ विकासाचे मोठमोठे दावे करणाऱ्यांनी आता प्रत्यक्ष परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत पुलिया आणि रस्ते बांधले जात नाहीत,तोपर्यंत या भागाचा खरा विकास अपूर्णच राहणार आहे. ”

