नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का ; महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेला शस्त्रनिर्मिती कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त. 📍मोठ्या प्रमाणावर शस्त्रे,स्फोटके आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त.

नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का ; महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेला शस्त्रनिर्मिती कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त.


📍मोठ्या प्रमाणावर शस्त्रे,स्फोटके आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त.


एस.के.24 तास 


गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीचा कणा मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गडचिरोली पोलिसांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेला शस्त्रनिर्मिती कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, स्फोटके आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ‘ ऑपरेशन अंतिम प्रहार ’ अंतर्गत ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस ठाण्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली शस्त्रे आणि स्फोटके लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडचिरोली विशेष अभियान पथक ‘सी-६०’, नारायणपूर डीआरजी तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संयुक्तरीत्या शोधमोहीम हाती घेतली.

२७ मे रोजी राबविण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. जप्त साहित्यामध्ये एक इन्सास रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन बारा बोअर रायफल आणि १८ जिवंत काडतुसे आढळून आली. 

याशिवाय शस्त्रनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लेथ मशीन, दोन मोटर, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटऱ्या, लोखंडी सळ्या आणि सोलर प्लेट्सही जप्त करण्यात आल्या.स्फोटक साहित्यामध्ये २५ किलो आयईडी, दोन क्लेमोर माईन्स, ११० डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर आणि ५०० हून अधिक बीजीएल सेल्सचा समावेश आहे. तसेच सात बीजीएल लाँचर आणि तीन ट्यूब लाँचरही हस्तगत करण्यात आला.

नक्षलवाद्यांनी घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हे साहित्य जंगलात लपवून ठेवले होते. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या शस्त्रनिर्मितीच्या अवजड यंत्रसामग्रीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार घटनास्थळीच नाश करण्यात आला. 

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. सीमावर्ती दुर्गम जंगलांचा आधार घेत नक्षलवादी अशा प्रकारचे कारखाने चालवत होते.  

पोलिसांनी त्यांची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केला आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे. तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !