खासगी शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या तरुणीने पतीला विष देवून केली ठार ; अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा मृतदेह जंगलात नेवून जाळला.
📍आरोपी मुख्याध्यापिकेला अटक ; तीन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात.
एस.के.24 तास
यवतमाळ : एखाद्या थरारपटास शोभेल अशी घटना यवतमाळात घडली. एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या तरुणीने पती सतत त्रास देतो म्हणून त्याला विष देऊन ठार केले.त्यानंतर आपल्या शिकवणी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा मृतदेह जंगलात नेवून जाळला. मात्र पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपी पत्नीस अटक केली.
निधी शंतनू देशमुख वय,23 वर्ष,रा.सुयोग नगर लोहारा) असे आरोपीचे नाव आहे. तीन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले.
शहरालगतच्या चौसाळा नजीक किटाकापरा जंगलात गुरूवारी अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.हा मृतदेह शंतनू देशमुख वय,32 वर्ष रा.सुयोग नगर, लोहारा यवतमाळ याचा असल्याची खात्री त्याच्या मित्राने शर्टच्या कापडाच्या तुकड्यावरून केली.
शंतनू आणि निधी यांचा वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. निधी सनराईज इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मुख्याधिपिका आहे. तेथे तिने युपीएससी मिशन २०३० असा विद्यार्थ्यांचा गृप तयार केला. पालकांचा विश्वास संपादन करून ती विद्यार्थ्यांना तयारीसाठी पहाटे मैदानावर बोलावत असले.
विद्यार्थी तिच्या प्रभावात आल्यानंतर तिने पतीच्या खुनात त्यांचा वापर केला. शंतनू लग्नानंतर तिला दारू पिवून दररोज शारिरीक, मानसिक त्रास देऊन तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे नियोजन तिने केले.त्यासाठी इंटरनेटवरून माहिती घेत घरीच विष तयार केले.
काही विषारी वनस्पती, झाडपत्ती वापरून तिने हे विष तयार केले.ते १३ मे रोजी दारूच्या नेशत असलेल्या पतीला बनाना शेकमधून दिले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शंतनूचा मृत्यू झाला. त्या रात्री तिने तीन विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतले.
पहाटे दीड, दोन वाजताच्या सुमारास या विद्यार्थ्यांसोबत चौसाळा परिसरातील जंगलात शंतनूचा मृतदेह नेवून टाकला. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा घटनास्थळी जावून तिने व विद्यार्थ्यांनी पेट्राल टाकून मृतदेह जाळला.
ही घटना गुरूवार,15 मे रोजी उघडकीस आली. घटनास्थळी एकही पुरावा नसल्याने पोलिसांपुढे तपास करण्याचे आव्हान होते. शंतनूचा दोन दिवसांपूर्वी विषबाधेने मृत्यू झाल्याचा शवचिकित्सा अहवाल मिळाला.
फॉरेन्सीक पथकाने मृतकाच्या शरीरावरील शर्टच्या बाहीचा तुकडा तसेच शर्टाचे बटन जप्त केले होते. या आधारावर बेपत्ता असल्याचा शोध घेण्यात आला.शिवाय, बेपत्ता आहे परंतु तक्रार दाखल नाही,अशा प्रकरणाचा शोध सुरु होता.तपासात एका खासगी शाळेत शिक्षक असलेला शंतनू बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
त्या आधारे पोलिसांनी शंतनू देशमुख याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश उईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून माहिती घेतली.त्यावेळी अर्धवट जळालेले शर्ट शंतनूचे असल्याचे सुजीत भांदक्कर याने ओळखले.शंतनू सोशल मीडियावर ॲक्टीव्ह आहे पंरतु, त्याचा फोन लागत नसल्याचे मित्रांनी सांगितले.
शंतनूच्या एका मित्राकडे त्याचा १३ मेचा फोटो मोबाईमध्ये सापडला. त्यात त्याने घातलेले शर्ट आणि मृतदेहाच्या शर्टचा तुकडा समान असल्याने मृतदेह शंतनूचाच असल्याचे स्पष्ट झाले.त्याच्या घरी तपास केला. तेव्हा मृतदेहाची अंडरवियर आणि घरी सापडलेली अंडरवियर एकाच कंपनीची असल्याने मृतदेह शंतनूचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली.
पोलिसांनी त्याची पत्नी निधीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. निधीने आधी आरोप नाकारले. पोलिसांनी विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर तिने शंतनूचा विष देऊन खून केल्याचे मान्य करत विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळल्याचे कबूल करत संपूर्ण घटनाक्रम कथन केला. शंतनू जिवंत आहे हे भासविण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपणस संदेश टाकत होतो,असेही सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, स्थानिक गुन्हे शाख प्रमुख सतीश चवरे, यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मुनेश्वर, कर्मचारी बबलु पठाण, नकुल रोडे, अतुल चव्हाण, मंजुश्री पारखे, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, आकाश सहारे यांनी केली. अधिक तपास पोलीस ठाण्याच्या निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, प्रशांत राठोड करीत आहे.