भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे घातपाताच्या तयारीत असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक. 📍एकूण ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या या नक्षलवाद्यांकडून ७ बंदुका आणि नक्षल साहित्य जप्त.

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे घातपाताच्या तयारीत असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक.


📍एकूण ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या या नक्षलवाद्यांकडून ७ बंदुका आणि नक्षल साहित्य जप्त.


एस.के.24 तास 


भामरागड : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या 5 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.यात एका विभागीय समितीच्या महिला सदस्याचा समावेश आहे. 


या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण 36 लाखांचे बक्षीस होते. उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली वय,२८, छत्तीसगड), पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी(१९, छत्तीसगड), देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून उर्वरित दोघांच्या वयाबाबत शंका असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाही.

नक्षलवाद्यांचा ‘टीसीओसी’ कालावधी सुरु असल्याने यादरम्यान ते घातपात घडवून आणतात. नक्षलवाद्यांचे गड समजले जाणाऱ्या अबुझमाड परिसरात येत असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा या अतिसंवेदनशील गावात ५० ते ६० च्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल याना ही गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० चे ८ पथक आणि सीआरपीएफ तुकडीला अभियानासाठी १८ मे रोजी रवाना केले.

१९ मे रोजी सुरक्षा जवानांनी बिनागुंडा गावाला वेढा घातला. यावेळी काही बंदूकधारी नक्षलवादी घातपाताची योजना आखत असल्याचे आढळून आले. मात्र, ते गावात असल्याने पोलीस जवानांनी गोळीबार न करता मोठ्या शिताफिने त्यातील पाच नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक स्वयंचलित ‘एसएलआर’ रायफलसह एक ३०३ रायफल, तीन ‘एसएसआर’ रायफल, दोन भरमार असे एकूण ७ बंदूका व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. 

अटक करण्यात आलेल्या पाच जणांमधून दोघे अल्पवयीन असल्याचा संशय असल्याने त्यांच्याबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही. उर्वरित तीन महिला नक्षलवादी आहेत.

यातील उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली ही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील पल्ली या गावातील रहिवासी असून ती विभागीय समिती सदस्य (डिव्हिसीएम) आहे. तिच्यावर महाराष्ट्र शासनाकडून १६ लाखांचे बक्षीस होते. 


तर पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी, देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता या दोघींवर अनुक्रमे ८ आणि ४ लाखांची बक्षिसे होती.गावाचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेत उर्वरित नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान त्या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधून नक्षलवादी गडचिरोली मध्ये 

गेल्या दोन वर्षात छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवादी मारल्या गेले.अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला. अजूनही त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरू असल्याने नक्षलवाद्यांची कोंडी झालेली आहे.

 नुकतेच करेगुट्टा येथे मोठे नक्षलविरोधी अभियान पार पडले. यात ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध सुरू केला आहे. म्हणूनच ते गडचिरोली - छत्तीसगड सीमा भागातील जंगलात आल्याचे समजते. गडचिरोली पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना यश आले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !