ITI शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या 211 विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रकरण.
📍नागभीड येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग सेंटर,नागभीड च्या संस्थापकासह चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल.
एस.के.24 तास
नागभीड : आयटीआय शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या 211 विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्र देणाऱ्या नागभीड येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग सेंटर,नागभीड च्या संस्थापकासह चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांकडून संस्थेने 56 लाख 71 हजार रूपये प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क वसूल करून फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.
चिमूर तहसीलमधील मालेवाडा येथील रहिवासी आशिष अरुण हाडगे वय, 20 वर्ष या विद्यार्थ्याने 17 मे रोजी नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की,त्याने 2020 ते 2022 या शैक्षणिक सत्रासाठी नागभीड येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग सेंटरमध्ये आवश्यक शुल्क भरून आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये प्रवेश घेतला आहे.
दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये चार सेमिस्टरची गुणपत्रिका देण्यात आली.परंतु वारंवार विनंती करूनही आजपर्यंत डिप्लोमा देण्यात आलेला नाही.यामुळे त्याला कुठेही नोकरी मिळत नाही.
आणि त्याची कुठेही नोंदणी होत नाहीय.नियमांनुसार, त्याने 25,000 रुपये शैक्षणिक शुल्क आणि 7,800 रुपये परीक्षा शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण केले. 32,800 रुपये फी घेऊनही,संस्थाचालकाने शैक्षणिक नुकसान केले आहे.
आणि भविष्य अंधारात टाकले आहे. 2019 ते 2024 या काळात आयटीआय आणि नर्सिंगमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण 211 विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क,परीक्षा शुल्क आणि इतर शुल्काच्या नावाखाली 56.71 लाख रुपये वसूल करण्यात आले आणि त्यांना बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात आले.
या प्रकरणी संस्थेचे संस्थापक,आंबेडकर चौक,पवनी जिल्हा भंडारा निवासी आनंदराव बारसागडे, )वाल्मिकी नगर नागपुर येथील रहिवासी प्रभात जयराम डिकवार, सुनीता रमाशंकर मिश्रा, रा.हिंगणा रोड,गेडाम ले आऊट, नागपूर व आंबेडकर चौक, पवनी, जिल्हा भंडारा येथील लोकेश आनंदराव बारसागडे यांच्या विरूध्द कलम 3 (5), 336 (3) आणि 308(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नागभीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.