मुल व नागभीड तालुक्यात वाघाने घेतले नऊ दिवसात आठ बळी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून आज रविवारी (18 मे) मुल आणि नागभीड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.मुल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर वय,70 वर्ष हा जंगलात बकऱ्या चरण्यासाठी गेला होता.
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे वय,64 वर्ष हा तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला होता.दरम्यान नऊ दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र वाघाची दहशत व भिती आहे.
पहिली घटना मूल तालुक्यात घडली.मुल येथील बफर कार्यालयातंर्गत येत असलेल्या भादूर्णीत येथील ऋषी झुगांजी पेंदोर वय,70 वर्ष हा शनिवारी बकऱ्या चरण्यासाठी गेला होता.रात्र होवूनही घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली.
रविवारी सकाळी वन विभागाने शोध मोहीम राबविली.कम्पार्टमेंट क्र.1008 च्या जंगलात शिवापूर चकच्या भागात त्याच्या शरीराचे अवयव आढळून आले.संपूर्ण शरीर वाघाने खाल्याने डोक्याचा भाग व एक हात तेवढा शिल्लक वनाधिकाऱ्यांना आढळून आला.
याच गावात पत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला आहे.मुल आणि नागभीड तालुक्यात या घटनेमुळे वाघांची प्रचंड दहशत आहे.
दुसऱ्या घटनेत नागभीड तालुक्यातील तळोधी बा वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक 697 मध्ये (तलाव परिसरात) आज रविवारी वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे हा इसम आपली पत्नी व अन्य नागरिकांसह सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेला होता.तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर मागून हल्ला केला.
हल्ला होताच त्यांनी आरडाओरडा केली. लगतचे लोकं वाचविण्यासाठी धावून आले. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. परंतु, वाघाच्या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी इसमाला तातडीने वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, गंभीर जखमी शेंडे यांचा मृत्यू झाला.
नऊ दिवस आणि आठ बळी : -
📍 दहा मे पासून तर आज रविवार पर्यंत एकूण आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
📍10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावातील सारिका शालीक शेंडे वय,55 वर्ष,कांता बुद्धाची चौधरी वय,60 वर्ष,शुभांगी मनोज चौधरी वय,31 वर्ष या तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा मृत्यु झाला.
📍11 मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघाच्या वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.
📍12 मे रोजी मूल तालुक्यात वडीलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दिपक भेंडारे हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला.
📍14 मे ला चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे वय,54 ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघाने तिला ठार केले.
📍रविवार 18 मे ला नागभीड व मूल तालुक्यात दोघांचा वाघाने बळी घेतला.त्यामध्ये नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे (६४) हा इसम तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता. वाघाने त्याला ठार केले.
📍मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर वय,70 वर्ष हा जंगलात बकऱ्या चरण्यासाठी गेला होता. वाघाने त्याला ठार करून शरीराचे पूर्ण अवयव खाल्ले आहे.