क्रिष्णा गार्डन अॅण्ड फॅमिली रेस्टारंट हॉटेल च्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू ; 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल.
पोलिसांनी हॉटेलची चौकशी करून या प्रकरणातील दहा ते बारा बाहेरून आलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल
गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावर सुनील डोगरा यांचे क्रिष्णा गार्डन नावाचे हॉटेल असून त्यांनी रजनी वासलवार यांच्या मालकीची असलेली जागा करारनाम्यावर वर्षभरासाठी भाड्याने घेतली होती. करार संपल्याने रजनी वासलवार यांनी सुनील डोगरा यांना जागा खाली करून देण्यास सांगितले.
डोगरा यांनी जागेचा ताबा सोडला नाही. त्यामुळे रजनी वासलवार यांनी सुनील डोगरा चालवत असलेल्या क्रिष्णा गार्डन हॉटेलची जागा चन्नावार नामक व्यक्तीला विकली. विशेष म्हणजे ७ जून २०२५ रोजी सुनील डोगरा यांचा करारनामा संपला असून नवीन करारनामा हा ५ जूनपूर्वी करण्याचे करारनाम्यात नमूद आहे.
रजनी वासलवार यांच्या कडून घेतलेली जागा चन्नावार यांनी ताब्यात घेण्यासाठी ७ जून रोजी रात्रीच्या सुमारास बाहेरून गुंडप्रवृत्तीचे लोक बोलावून त्यांच्याकडून जेसीबीच्या साहाय्याने हॉटेलची तोडफोड केली.
हॉटेल मालक सुनील डोगरा यांनी याबाबतची लेखी तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी हॉटेलची चौकशी करून या प्रकरणातील दहा ते बारा बाहेरून आलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी,या प्रकरणात दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम करीत आहेत.