ब्रम्हपूरीतील निर्माणाधीन ई-लायब्ररीची आमदार विजय वडेट्टीवारांनी केली पाहणी.
ब्रम्हपूरी मतदारसंघात अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा मानस. - आमदार विजय वडेट्टीवार
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : २८/०६/२५ ब्रम्हपूरी शहराची विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून विशेष ओळख आहे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतुन ब्रम्हपूरी शहरात १० कोटी रुपये खर्चून ई-लायब्ररीचे बांधकाम सुरू असुन सदर बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
याठिकाणी आमदार विजय वडेट्टीवारांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. सोबतच लायब्ररी मध्ये दर्जेदार फर्निचर व इतर सोयीसुविधा सुयोग्य पद्धतीने करण्याच्या सुचना यावेळी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. येत्या दोन महिन्यांत ई-लायब्ररी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाणार आहे.
सदर ई-लायब्ररी ही विदर्भातील सर्वांत मोठी ई-लायब्ररी असुन यामध्ये जवळपास २०० विद्यार्थ्यांची आसन क्षमता असणार आहे. तर ५० विद्यार्थ्यांसाठी संगणकीय प्रणालीने तंत्रज्ञानयुक्त बैठक व्यवस्थेसोबतच ही लायब्ररी आयआयटी खडगपुर सोबत आॅनलाईन कनेक्ट असणार आहे.
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय याठिकाणी करण्यात येणार आहे. पुर्णतः वातानुकूलित यंत्रणा बसवली गेली आहे. सोबतच याठिकाणी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व मार्गदर्शनासाठी प्रशस्त मोठे हाॅल देखील बनविण्यात आले आहेत.माझ्या मतदारसंघातील ब्रम्हपूरी हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे.
सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध असलेली अनेक शाळा-महाविद्यालये या शहरात असल्याने मतदारसंघासह आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. मतदारसंघात अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडवून शैक्षणिक क्रांती घडविण्याचा माझा मानस आहे. म्हणूनच सदर ई-लायब्ररी मंजूर करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश मिळाले. ई लायब्ररीचे बांधकाम पुर्ण झाले असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाणार आहे.
-- विजय वडेट्टीवार विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा आमदार ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र