नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाया जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.
सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास काल दिनांक 27/06/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने शिताफिने ताब्यात घेवून त्याला अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 104 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दि. 27/06/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नवनिर्मित पोस्टे कवंडे हद्दीतील कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके, पोस्टे कवंडे येथील पोलीस पथक आणि सी कंपनी 37 बटा. सिआरपीएफचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबवित असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते.
त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता, सदर इसमाचे नाव 1) अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (उप-कमांडर, कोरची दलम), वय 28 वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, सदर इसम हा पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो कवंडे जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. तसेच पोलीस तपासात उघड झाले की, सदर माओवाद्याचा दि. 01 मे
2019 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत मौजा जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवानांच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग होता. जहाल माओवादी अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (उप-कमांडर,कोरची दलम), वय ल,28 वर्षे, रा.कवंडे, तह. भामरागड,जि.गडचिरोली
यास दिनांक 29 मार्च 2021 रोजी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मौजा खोब्राामेढा जंगल परिसरात झालेल्या चकमकीवरुन पोस्टे पुराडा येथे दाखल अप क्र. 11/2021 अन्वये काल दिनांक 27/06/2025 रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांनी त्यास 07 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. त्याच्यावर आजपावेतो 03-चकमक व 2-खून असे एकूण 05 गुन्हे दाखल आहेत.
दलममधील कार्यकाळ : -
1) सन 2012 मध्ये निब कंपनी (छ.ग.) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2017 पर्यंत काम केले.
2) सन 2017 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर काही महिने काम केले.
3) सन 2017 ते 2020 पर्यंत कोरची दलममध्ये उप-कमांडर पदावर काम केले.
4) सन 2020 पासून आजपावेतो महाराष्ट्र छत्तीसगड सिमेवर कवंडे जंगल परिसरात राहून आपले अस्तित्व लपवून पोलीसांची माहिती मिळविण्याचे काम करीत होता.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस : -
1) महाराष्ट्र शासनाने अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (उप-कमांडर, कोरची दलम) याच्यावर 06 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 37 बटा. सिआरपीएफ, श्री. दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश
अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री.अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कवंडेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सिआरपीएफ 37 बटा.सी-कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.