आरमोरी - देसाईगंज मार्गावर बिघडलेल्या ट्रकला टोईंग करून आणत असताना ट्रॅक्टर उलटून तरुण चालकाचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास न्युज नेटवर्क
देसाईगंज (वडसा) : तालुक्याच्या कोंढाळा येथील तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना गुरुवार ला दुपारी आरमोरी - देसाईगंज मार्गावर घडली.
प्रशांत राजू बोरूले वय,29 वर्ष रा.कोंढाळा असे मृत चालकाचे नाव आहे.बिघडलेल्या ट्रकला टोईंग करून आणत असताना हा अपघात घडला.विशेष म्हणजे प्रशांतच्या वडीलांनी चार महिन्यांपूर्वी विष घेऊन आत्महत्या केल्याने घरात तो एकटाच कमावता होता.
कोंढाळा गावापासून 2 किलोमिटर अंतरावर आरमोरी मार्गावरील धोडीनालाजवळ एका ट्रकमध्ये बिघाड होऊन तो बंद पडला होता. त्यामुळे त्या ट्रकला कोंढाळ्याला आणण्यासाठी प्रशांत बोरूले हा विनाट्रॉली ट्रॅक्टर घेऊन गेला होता. ट्रॅक्टरला मोठा दोरखंड (टोचन) बांधून कोंढाळा गावाकडे आणले जात होते.
धोडीनालावरील मुख्य मार्गावर खोलगट भाग असल्याने ट्रॅक्टरचा वेग वाढल्याने चालक प्रशांतने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकला बांधलेल्या दोरखंडाला ढिल पडून तो ट्रॅक्टरच्या चाकात गुंडाळल्या गेला. त्यामुळे ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले आणि तो रस्त्याच्या कडेला उलटला. प्रशांत त्या ट्रॅक्टरखाली दबल्या गेला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. पोलीस पाटील किरण कुंभलवार यांनी ही माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यास दिली. पोलिसांनी ट्रॅक्टर सरळ करत मृतदेह बाहेर काढून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठवला. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे.
विशेष म्हणजे, मृत प्रशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.त्यामुळे घरात तो एकमेव कमावता होता. त्याला प्रशांतच्या आई, पत्नी, चार वर्षाची मुलगी आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.