आश्रमशाळा वसतिगृहातील मुलाचा गळा आवळून खून ; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात.
एस.के.24 तास
जालना : जिल्हयातील भोकरदन या तालुक्याच्या निकाली असलेल्या निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी याच वसतिगृहातील दोन अल्पवयीन विद्यार्थाना ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या घटनेच्या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले की,या संदर्भातील घटना कळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वसतिगृहात भेट देऊन मृत मुलाची पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचा खुणा दिसून आल्या.
त्यामुळे प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांना आला.त्या दृष्टीने तपास केला असता त्याच वसतिगृहातील दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांनी दोरीने मृताचा गळा आवळून हा खून केला असल्याचे समोर आले.
हे तिघेही अल्पवयीन विद्यार्थी भोकरदन येथील वसतिगृहात एकत्र राहतात.त्यापैकी एक जण मृत विद्यार्थ्याच्या खोलीमध्ये राहात होता.तर दुसरा घटनास्थळ असलेल्या खोलीपासून दोन - तीन खोल्यांच्या अंतरावर राहावयास होता.मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली.
त्यांच्यात भांडणेही झाली होती. रात्री बारा- साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही विधिसंघर्षग्रस्त मुलांची अधिक चौकशी करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.