गडचिरोली पोलीस दलातील 07 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे " पोलीस शौर्य पदक " जाहिर.
📍मौजा हेमलकसा - कारमपल्ली रस्त्यावरील चकमकी दरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी.
एस.के.24 तास
गडचिरोली : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा.महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण 07 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले.
सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन 2025 मध्ये एकूण 07 पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र, 210 पोलीस शौर्य पदक व 08 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.
सन 2025 मध्ये गडचिरोली पोलीस दलातील 1) सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, 2) सफौ/1127 मनोहर कोतला महाका, 3) चापोहवा/977 मनोहर लचमा पेंदाम, 4) पोशि/3311 प्रकाश ईश्वर कन्नाके, 5) पोशि/5415 अतुल सत्यनारायण येगोलपवार, 6) पोशि/5916 हिदायत सदुल्ला खान, 7) शहीद पोशि/5210 सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर) यांना पोलीस शौर्य पदक मिळाले आहेत.
सन 2017 साली सी- 60 पथके पोस्टे कोठी येथून एमपीव्ही (ग्घ्ज्) वाहनांद्वारे भामरागडला परत येत असताना, माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणून पोलीस पथकांवर हल्ला केला होता. माओवाद्यांच्या हा भ्याड हल्याचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विवेकबुद्धी आणि मोठया धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी जखमी व अडकलेल्या पोलीस जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत माओवाद्यांच्या प्रखर गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते.
वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या भुसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे. यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.