ब्रम्हपुरी तालुक्यातील भुज बिटामध्ये पद्मापूर जंगल नर्सरीत 3 दिवसानंतर सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - दिनांक,27/02/2026 शुक्रवार ब्रम्हपुरी तालुक्यातील भुज बिटामध्ये येत असलेल्या पद्मापूर येथील जंगलातील नर्सरी मध्ये झाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या कुसऱ्या गवत कापून आणण्यासाठी गेलेल्या यमुना बाजीराव मडावी वय, 70 वर्ष या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तब्बल 3 दिवसानंतर आज दिनांक,27/02/2026 रोजी सकाळी 8:00.वा. दरम्यान उघडकीस आली आहे.
सदर महिलेचा छीन्न- विछीन्न अवस्थेत असलेला मृतदेह पाहून वाघाने ठार केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वन विभाग घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे मृतदेह पाठविण्यात आला.
तात्पुरते सानुग्रह अनुदान म्हणून मृत यमुना बाजीराव मडावी यांच्या कुटुंबीयांना रुपये, 2,25000/- (दोन लाख पंचवीस हजार रुपये) देण्यात आले.उर्वरित रक्कम चौकशी अंतिम त्यांना देण्यात येईल असे वनाधिकारी यांनी सांगितले. मृतकाला दोन अपत्य असून तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात असून पद्मापूर,भुज,मुडझा,एकारा या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर नरभक्षी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी या परिसरातील नागरिकांची वनविभागाला मागणी आहे.सदर नरभक्षी वाघावरती वनविभागाची देखरेख सुरू असून त्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

