ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्‍हेरनवरगाव येथील चिमुकल्या झाल्या आई - वडिलांविना पोरक्या. 📍स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्ष,समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन.

ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्‍हेरनवरगाव येथील चिमुकल्या झाल्या आई - वडिलांविना पोरक्या.


📍स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्ष,समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : तालुक्यातील अर्‍हेरनवरगाव येथील तुषार ठेंगरे यांचा जून महिन्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर बैलपोळ्याच्या दिवशी त्यांची पत्नी वैशाली आजारपणाने निधन झाले.आई - वडिलांच्या जाण्यामुळे त्यांच्या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत.


ब्रम्हपुरी तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्‍हेरनवरगाव येथील तुषार ठेंगरे यांचा गावातीलच वैशाली नामक युवतीशी विवाह झाला.त्यांच्या संसाराच्या वेलीला दोन कळ्या उमलल्या आणि त्यांचे नाव प्राजक्ता आणि शुभ्रा ठेवण्यात आले. 

प्राजक्ता 6 वर्षाची, तर शुभ्रा 2 वर्षाची आहे. घरी पोट भरेल इतकीक शेती आणि त्यामुळे हातावर आणणे आणि पानावर खाणे ही त्यांची परिस्थिती होती.

संसार सुखाने चालला होता. अशातच अचानक जून महिन्यात तुषार ठेंगरे यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष व मुलींचा बाप गेल्यानंतर वैशालीने मोठ्या खंबीरपणे उभे राहून जगण्यासाठी संघर्ष सुरू केला.मिळेल ते काम करून ती कुटुंबातील म्हातारे सासू,सासरे व दोन लहान मुलींचा उदरनिर्वाह करीत होती. 

पतीच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच अवघ्या दोन महिन्यानंतर 20 ऑगस्ट 2025 रोजी वैशाली अचानक आजारी पडली.वैशालीची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला ब्रम्हपुरीतील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी बरेच उपचार केले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. बैल पोळ्याच्या दिवशी वैशालीचेही निधन झाले. वैशालीच्या जाण्यामुळे ठेंगरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

आई-वडिलांच्या जाण्यामुळे दोन्ही चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या असून,ब्रह्मपुरी तालुक्यातील स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्ष,समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !