सोनेगाव येथे मोफत हिमोग्लोबीन (HB) तपासणी शिबिर उत्साहात पार पडले ; 70 महिलांची तपासणी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ग्रामीण महिलांचे आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य सशक्त राहावे, त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनची (HB) पातळी वेळेवर तपासली जावी व गरजूंना उपचार मिळावेत या उद्देशाने धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेगाव येथे मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून, तो बहुधा दुर्लक्षित राहतो. यासाठी वेळेत तपासणी आणि उपचार होणे गरजेचे आहे. या उपक्रमामार्फत महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती घडविणे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.
हा उपक्रम धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य महाप्रबंधक मा.श्री.देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पार पडला.या शिबिरात मा. सौ. अर्चना उकीनकर (आशावर्कर, अंतुर्ला) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमात एकूण ७० किशोरवयीन मुली व महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामधून ज्या महिलांचे हिमोग्लोबीन स्तर कमी असल्याचे आढळले, त्यांना त्वरित लोह (Iron) गोळ्यांचे वाटप करून प्राथमिक उपचार देण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पूजा वानखेडे, आशिष हलगे,दिनेश कामतवार,दीप्ती काकडे, सुषमा सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे उपक्रम प्रभावीपणे आणि काटेकोर नियोजनासह पार पडला.
गावात आरोग्यविषयक सुविधा मर्यादित असतानाही,हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठा दिलासा आणि मार्गदर्शन ठरला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली.