सिंदेवाही पोलिसांनी मोहफुलांची अवैध दारू तयार करण्याच्या ठिकाणी धाड टाकून ; मुद्देमालासह 3 आरोपीना केली अटक.
राजेंद्र वाढई उपसंपादक - एस.के.24 तास
सिंदेवाही : अवैध मोहफुलांची दारू पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात काढली जात असल्याची चाहूल सिंदेवाही पोलिसांना लागल्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून मार्ग काढून नदीच्या दुसऱ्या काठावर मोहफुलांची अवैध दारू काढणाऱ्या आरोपींना सिंदेवाही पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली असता मोठा मुद्देमाल आणि दारूच्या साठ्याची राखण करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली. यामध्ये चंद्र प्रल्हाद आनंदे वय,39 वर्ष,प्रणय प्रभाकर लोखंडे वय,29 वर्ष, आणि साहिल शामराव कामडी वय,23 वर्ष यांचा समावेश आहे.
अवैध दारू काढण्याचा मोठा डाव सिंदेवाही पोलिसांनी उधळून लावला.पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण पाटील यांच्या पथकाने पळसगाव (जाट) पासून 2 कि.मी.अंतरावर असलेल्या नदी पात्राजवळ ही कारवाई केली.
सिंदेवाही पोलिसांना गुप्त माहिती मिळाली मिळाली होती की, काही कुख्यात दारू तस्कर पोळ्यासाठी मोहफुलाची दारू तयार करत आहेत. ही माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने कारवाईचा आराखडा तयार केला. पीएसआय भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलिस कर्मचारी दादाजी रामटेके आणि लाटकर यांचा समावेश होता.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 9,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यामध्ये,3 प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी 10 लिटर, अशी एकूण 30 लिटर हातभट्टी दारू (किंमत 3,000 रुपये) आणि 3 ड्रममध्ये प्रत्येकी 45 लिटर,असा एकूण 135 लिटर मोहाचा सडवा (कच्चा माल) किंमत 6,075 रुपये) जप्त करण्यात आला.
सिंदेवाही पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारूच्या व्यवसायावर मोठा प्रहार झाला आहे. जप्त केलेला दारू साठा फक्त याच व्यक्तींचा आहे की याचा आणखी कुणी सूत्रधार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
संपूर्ण कारवाही मध्ये शुभम उराडे, संजय जुमनाके, शुभम भटकर यांनी सहकार्य केले. तपासादरम्यान आणखी काही नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली गेली.