भांडे घासण्यासाठी निघालेल्या एका कुष्ठरोगी महिलेवर वाघाने हल्ला करून केले ठार.
📍मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथील घटना.
एस.के.24 तास
मुल : रात्रीचे घरातील भांडे बाहेर घासण्यासाठी निघालेल्या एका कुष्ठरोगी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सोमवारी पहाटे 4:30 वा.सुमारास मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथे घडली.
अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने वय,60 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.
तिला वाचवण्यासाठी तिच्या पतीने शर्थीचे प्रयत्न केले पण वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे महिला गंभीर जखमी झाल्याने मृत्यूमूखी पडली.सोमनाथ प्रकल्पातील ही दुसरी घटना असून या घटनेने प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.या घटनेनंतर प्रकल्पामध्ये प्रशासन,वनविभागाने वन्य प्राण्यांपासून येथील नागरिकांचे संरक्षण करून सोयी सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.
मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये 350 कुटुबांचे वास्तव्य आहे. नेहमी प्रमाणे अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने ही महिला आज पहाटेच्या सुमारास रात्रीचे भांडे घासण्याच्या उदेश्याने सदर महिला भांडे घेऊन घराच्या मागील बाजूस निघाली.मागील भाग जंगलाला लागून असल्याने या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने घराच्या मागे आलेल्या अन्नपूर्णा बिलाने हिच्यावर हल्ला चढविला.त्यानंतर तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
पत्नीने प्रचंड आरडाओरड केल्याने पती तुळशीराम जागा झाला आणि मदतीसाठी धावून आला. पतीने पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी तिचे पाय धरून सोडविण्याचा प्रयत्न केला.हा प्रसंग सुरू असतानाच नागरिक धावून आल्याने वाघाने अन्नपूर्णाला आपल्या तावडीतून सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. तो पर्यंत पत्नीला मृत्यू झाला होता.
सोमनाथ प्रकल्पाचे समन्वयक अरूण कदम यांनी, या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले.त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविला.
वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही प्रकल्पातील दुसरी घटना आहे. 8 जून रोजी अशाच प्रकारच्या घटनेत प्रकल्पातील कुष्ठरोगी ठार झाला होता.पुन्हा आज सोमवारी 8 सप्टेंबर रोजी 60 वर्षीय महिलेचा वाघाने घरीच बळी घेतला आहे. हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये वनविभागाने वन्यप्राण्यांपासून सरंक्षण मिळावे याकरीता सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.