सावली भाजपात गटबाजीमुळे कार्यकर्ते नाराज - माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा बॅनर वरील गायब फोटो वरून चर्चेला उधाण.
📍माजी मंत्री मुनगंटीवार यांचेकडून कामे करून घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर मुनगंटीवार नाराज.
एस.के.24 तास
सावली : सावली येथे भारतीय जनता पार्टीचा मेळावा १ नोव्हेंबरला भव्यदिव्य होत असतांना बॅनर वर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो नसल्याने व निमंत्रण पत्रिकेतही नाव नसल्याने सावलीत भाजपा पक्षात गटबाजीची चर्चा जोरात आहे.
सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती राहणार असून माजी मंत्री हंसराजभैय्या अहिर,आमदार बंटीजी भांगडिया,माजी खासदार अशोकजी नेते,माजी मंत्री शोभाताई फडणवीस,माजी आमदार अतुलजी देशकर, सीडीसीसी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत.
मात्र सावली तालुक्यात नेहमी संपर्कात असलेले,कार्यकर्त्यांना कामे देऊन कार्यकर्ते टिकवून ठेवणारे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा कार्यक्रम पत्रिकेत नाव व बॅनरवर फोटो नसल्याने कट्टर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.जिल्हा परिषद,पंचायत समिती उमेदवारीही काही कार्यकर्ते मुनगंटीवार तर काही भांगडिया यांचेकडे मागत असल्याने सावलीतही भाजपच्या गटबाजीच्या चर्चाना उधाण आले आहे.


