भामरागड अंतर्गत फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना.
एस.के.24 तास
भामरागड : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या अति-दुर्गम भागात, उपविभाग भामरागड अंतर्गत फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी, एका महत्त्वपूर्ण नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.
अवघ्या २४ तासांच्या विक्रमी वेळेत उभारलेले हे मदत केंद्र, नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि स्थानिक आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक 'मैलाचा दगड' ठरणार आहे, असे मत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी व्यक्त केले.राज्याच्या सुरक्षा धोरणातील 'सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या' मोहिमेतील हे ८ वे नवीन केंद्र आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने या केंद्रास २८/१०/२०२५ रोजी मंजुरी दिल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाने तातडीने याची उभारणी केली.
हे मदत केंद्र उभारण्यासाठी १,०५० मनुष्यबळ (यात सी-६० कमांडो, नवनियुक्त पोलीस जवान, विशेष पोलीस अधिकारी आणि बांधकाम कंत्राटदार यांचा समावेश होता) आणि ४ जेसीबी, ७ ट्रेलर, २ पोकलेन, २५ ट्रक यांचा वापर करण्यात आला. या केंद्रात पोलीस दलासाठी वायफाय, १२ पोर्टा केबिन, आरओ प्लांट आणि सुरक्षा भिंती (मॅक वॉल, बी.पी मोर्चा) अशा आधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
भामरागडपासून २० कि.मी. आणि छत्तीसगड सीमेपासून फक्त ७ कि.मी. अंतरावर असलेल्या या केंद्राचे उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) अजय कुमार शर्मा, उप-महानिरीक्षक (अभियान), सीआरपीएफ यांची उपस्थिती होती.नीलोत्पल, पोलीस अधीक्षक,गडचिरोली,सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली,दाओ इंजीरकन कींडो, कमांडण्ट, ३७ बटालियन, सीआरपीएफ,पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी स्पष्ट केले की,या केंद्राच्या माध्यमातून फुलनार भागाची सुरक्षा मजबूत होईल आणि स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.
जनजागरन मेळावा आणि मदतीचा हात : -
पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमासोबतच एक जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित नागरिक आणि आदिवासी बांधवांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात महिलांसाठी साड्या आणि चप्पल, पुरुषांसाठी घमेले आणि ब्लँकेट, तर युवकांसाठी शैक्षणिक साहित्य आणि खेळाचे साहित्य (क्रिकेट किट,व्हॉलीबॉल) यांचा समावेश होता.
या नवीन केंद्राच्या स्थापनेमुळे परिसरातील रखडलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. तसेच, वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे भविष्यात या भागात नवीन रस्ते बांधकाम आणि एस.टी.बस सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
या केंद्रामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे ३ अधिकारी,५० अंमलदार,एसआरपीएफ आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

