टेकडा ताल्ला येथे बस सेवा सुरू करण्याची मागणी तहसीलदारांना साकडे.
एस.के.24 तास
सिरोंचा : स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला हे गाव नियमित बस सेवेपासून वंचित असल्याने, येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष रवि बारसागंडी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन गावात तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी केली.
विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल निवेदनात नमूद केल्यानुसार, टेकडा ताल्ला हे तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असूनही येथे अद्याप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस पोहचलेली नाही. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे.
तसेच,आरोग्य सुविधा किंवा सरकारी कामांसाठी शहरात जाणाऱ्या वृद्ध, रुग्ण आणि शेतकरी वर्गाला खाजगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागतो, जो असुरक्षित आणि त्रासदायक ठरत आहे.पावसाळ्यात गाव होते संपर्कहीन दळणवळणाची कोणतीही अधिकृत सोय नसल्याने पावसाळ्यात या गावचा संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण होते. रस्ते आणि प्रवासाच्या साधनांच्या अभावामुळे गावाचा सर्वांगीण विकास खुंटला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रमुख मागण्या...
1) टेकडा ताल्ला गावासाठी सकाळी आणि संध्याकाळी किमान दोन नियमित बस फेऱ्या सुरू कराव्यात.
2) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार बसचे नियोजन करावे.
3) अहेरी किंवा सिरोंचा आगारातून या गावाला बस सेवेने जोडावे.
या निवेदनावर रवि बारसागंडी यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे

