युवकाचा निर्घृण खून झाल्याचे उघडकीस चिमूर शहरात खळबळ.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर शहरात खळबळ उडविणारी घटना समोर आली असून नेहरू शाळेच्या मागील परिसरात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आकाश प्रभाकर उताने वय,३८ वर्ष,रा.तनस कॉलनी, चिमूर असे मृतकाचे नाव आहे.
मृतकाची आई श्रीमती उषा प्रभाकर उताने वय,५० वर्ष यांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश उताने हा ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घरातून बाहेर पडला होता. दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास तो आपल्या मावशी आशा प्रभु निखाडे रा.मिसार कॉलनी, नेताजी वार्ड,चिमूर यांच्या घरी जाऊन जेवण करून निघून गेला.
त्यानंतर तो कुठे गेला याची माहिती मिळाली नाही.आकाश हा नेहमी रात्री उशिरा घरी येत असल्याने तो मावशीकडेच थांबला असावा, असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र तो रात्री घरी परतलाच नाही.४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास आशा निखाडे यांचे पती प्रभु निखाडे यांनी आकाश हा नेहरू शाळेच्या मागील बाजूस मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच उषा उताने यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आकाश हा रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, तोंडावर व कानाजवळ गंभीर जखमा असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता.घटनास्थळी रक्ताचे डाग असलेला दगडही आढळून आला.
या घटनेत ३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजतापासून ते ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.१५ वाजेपूर्वीच्या दरम्यान अज्ञात इसमाने आकाश उताने याच्या डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण करून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी चिमूर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी तालकोटे करीत आहेत.

