आरमोरी तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांना शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष. 📍13 युवकांना तब्बल 42 लाख 16 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस ; एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार.

आरमोरी तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांना शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष.


📍13 युवकांना तब्बल 42 लाख 16 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस ; एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार.


एस.के.24 तास 


आरमोरी : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना हेरून त्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 13 युवकांना तब्बल 42 लाख 16 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,राजू मुखरू मडावी रा.राजोली,जि. चंद्रपूर आणि धर्मेंद्र गणपत शेडमाके रा.वडधा,ता.आरमोरी) या दोघांनी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी गुणवंत सोमाजी दडमल रा.सावरखेडा,ता.कुरखेडा यांच्यासह इतर 12 तरुणांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात लाखो रुपये उकळले. 


बऱ्याच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही नियुक्ती पत्र मिळाले नाही आणि दिलेले पैसेही परत मिळेनासे झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणातील संशयित आरोपी धर्मेंद्र शेडमाके याला पोलिसांनी 19 मार्च रोजी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजू मडावी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


सरकारी नोकरीसाठी कोणत्याही त्रयस्त व्यक्तीला पैसे देऊ नका. अशा प्रलोभनांना बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये अजून काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !