अभावावर मात करत यूपीएससीतून गट " अ " राजपत्रित शास्त्रज्ञ (Scientist) पदावर निवड.

अभावावर मात करत यूपीएससीतून गट " अ " राजपत्रित शास्त्रज्ञ (Scientist) पदावर निवड.


एस.के.24 तास 


नागभीड : अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आणि अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेल्या संदीप वासुदेव कोवे यांची कठोर परिश्रम, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेन्यात येनाऱ्या गट ‘अ’ राजपत्रित शास्त्रज्ञ  (Group ‘A’ Gazetted-Scientist) या पदावर  निवड झालेली असून त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंपदा,नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागात करण्यात आली आहे आणि ते सध्या नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.


संदीप कोवे यांची निवड २०२४ मध्ये झाली असून ते मार्च २०२५ मध्ये सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मार्च २०२६ पर्यंत एक वर्षाचे प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.त्यांचे इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण जनता स्कूल नागभीड येथे झाले. पुढे त्यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी येथून बी.एस्सी, शासकीय विज्ञान महाविद्यालय नागपूर येथून एम.एस्सी, तसेच शासकीय बॅरिस्टर एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालय नागपूर येथून बी.एड. पदवी प्राप्त केली.


शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी SET, NET, GATE, TAIT अशा विविध पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या. यापूर्वी त्यांनी इयत्ता ११वी–१२वी तसेच बी.एस्सी. आणि एम.एस्सी. स्तरावर कराराधारित शिक्षक व सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा अनुभव घेतला आहे.यानंतर त्यांनी खाण मंत्रालयाअंतर्गत येनाऱ्या जेएनएआरडीडीसी (JNARDDC) नागपूर येथे वैज्ञानिक सहाय्यक म्हणून सात वर्षे शासकीय नोकरी सांभाळत असतानाच  सातत्याने अभ्यास सुरू ठेवला आणि यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले.


या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे वडील स्व.वासुदेव कोवे यांनी मुलाने उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे स्वप्न पाहिले होते. आज ते हयात नसले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप यांनी सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या आई सौ. सरिता कोवे यांनी कठीण परिस्थितीतही मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक टप्प्यावर मानसिक आधार दिला.


तसेच पत्नी सौ.टीना कोवे यांनी त्यांच्या अभ्यासाच्या काळात खंबीर साथ देत घराची जबाबदारी सांभाळली आणि नेहमीच प्रेरणा दिली. धाकटे भाऊ प्रदीप आणि कुलदीप कोवे यांनीही प्रत्येक टप्प्यावर साथ देत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले, आजी सौ. अनुसयाबाई कोवे आणि आत्या सौ. अनीता कोवे यांचे आशीर्वाद त्यांच्या यशामागे महत्त्वाचे ठरले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले, असे संदीप कोवे यांनी नमूद केले.


हे यश त्यांच्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारे असून, ते आज हयात असते तर त्यांना याचा अत्यंत अभिमान आणि आनंद वाटला असता,अशी भावना संदीप कोवे यांनी व्यक्त केली. त्यांनी या यशाचे श्रेय कुटुंबीय,मित्र,मार्गदर्शक आणि वरिष्ठ यांना दिले आहे.तसेच हे यश अनुसूचित जमाती (ST) समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शिक्षण, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर मोठी उद्दिष्टे गाठता येतात, असा सकारात्मक संदेश देणारे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !