अडीवागू पुलाचे काम रखडले तात्काळ पूर्णत्वाची मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा.
एस.के.24 तास
सिरोंचा : सिरोंचा - आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ ला जोडणाऱ्या टेकडा–कंबलपेठा मार्गावरील अडीवागू नाल्यावर सुरू असलेले पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ४० गावांचा संपर्क धोक्यात आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळा तोंडावर आला असतानाही पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. पर्यायी रस्त्याची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अलीकडेच येथे अपघाताची घटना घडली असून मोठी जीवितहानी टळली असली तरी प्रशासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नाही, अशी टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाकापचे सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, पावसाळ्यापूर्वी सुरक्षित पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी तसेच कामातील विलंबाबाबत सखोल चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते,याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

